बारामती पालिकेकडून दिलगिरी व्यक्त

बारामती पालिकेकडून दिलगिरी व्यक्त

Published on

बारामती, ता. २९ : प्रजासत्ताक दिनानिमित्त बारामती नगरपालिकेत झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न झाल्याबाबत नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली होती.
बहुजन समाज पक्षाचे महासचिव काळूराम चौधरी, नगरसेविका संघमित्रा चौधरी, अनिकेत मोहिते, मंगलदास निकाळजे, रवींद्र सोनवणे, दीपक घोरपडे व इतर सहकाऱ्यांनी नगर परिषदेसमोर या घटनेचा निषेध व्यक्त केला होता. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन न झाल्याबद्दल, तसेच संविधानाचे वाचनही न केल्याबद्दल काळूराम चौधरी, अनिकेत मोहिते व इतरांनी याबाबत तीव्र आक्षेप घेतला होता.
या पार्श्वभूमीवर बारामती नगरपालिकेच्या प्रशासनाने खुलासा करत याबाबत उपमुख्याधिकाऱ्यांनी प्रसिद्ध पत्रक देत दिलगिरी व्यक्त केली. यात नमूद केले आहे की, २६ जानेवारी रोजी झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमात पूजन होऊ न शकल्याने काही नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. मात्र, कोणाच्याही भावना दुखावण्याचा प्रशासनाचा हेतू नव्हता व भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही. यापुढे शासनाचे प्रचलित निर्णय, परिपत्रके तसेच लोकभावनेचा विचार करून सर्व राष्ट्रपुरुषांचा यथोचित सन्मान राखण्याची दक्षता घेतली जाईल. घडलेल्या प्रकाराबाबत लोकभावनेचा आदर ठेवून प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्याधिकारी योगिता दरेकर यांनी दिली.
याप्रकरणी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकारी व शासनाकडे तक्रार करण्यात येणार असून, न्यायालयात देखील दाद मागणार असल्याचे काळूराम चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com