चाकणला कांदा उत्पादकांचे ठिय्या आंदोलन

चाकणला कांदा उत्पादकांचे ठिय्या आंदोलन

चाकण, ता.२९ : येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आज (ता. २९) पुणे-नाशिक महामार्गांवर ठिय्या आंदोलन केले. कांद्याला २० रुपये हमीभाव देण्याची जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने पाच किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेडचे प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आंदोलकांची समजूत काढली व मागण्या जिल्हाधिकारी, मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू, असे आश्वासन दिले. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

प्रांताधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी बाजार समितीच्या कार्यालयासमोर व कार्यालयात सविस्तर चर्चा केली. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी महामार्ग सुमारे एकतासावर रोखून धरला होता. पोलिसांनाही आंदोलन आटोक्यात येत नव्हते. आंदोलक पोलिसांना दाद देत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी शेतकऱ्यांना महामार्गावरून कसेबसे उठवले व बाजार समिती कार्यालयाच्या आवारात नेले.

चाकण (ता.खेड) येथील कांदा बाजारात आज महात्मा फुले बाजारात कांद्याची सुमारे एक लाख पिशव्यांची आवक झाली. सुमारे पन्नास हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. कांद्याची आवक झाल्यानंतर सकाळी कांद्याचे लिलाव सुरू झाले.परंतु कांद्याचे बाजारभाव अगदी पाच ते सात रुपये प्रतिकिलोला आल्याने शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले.
शेतकऱ्यांनी साडे अकराच्या सुमारास मार्केट यार्ड येथून निघून पुणे -नाशिक महामार्गांवर ठिय्या आंदोलन केले. कांदा, उत्पादक शेतकऱ्यांनी महामार्ग रोखल्याचे पोलिसांना कळल्यानंतर पोलिसांची पथके आली. पोलिस अधिकारी आले. यावेळी शेतकऱ्यांनी जोरजोरात घोषणा दिल्या. सरकारचा निषेध करत होते. सरकारने कांद्याला जे अनुदान दिले आहे. ज्यांची विक्री ३१ मार्चच्या अगोदर होणार आहे. त्यांना अनुदान देण्यात येईल, असा आदेश काढल्याने शेतकरी संतप्त झाले होते. अनुदान देण्याची मुदत शासनाने वाढवावी व कांद्याला पंधरा, वीस रुपये हमीभाव द्यावा, अशी कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. याबाबत प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याशी शेतकऱ्यांनी चर्चा केली.
यावेळी शेतकरी अमित घेनंद, राजेंद्र मुंगसे, विनायक गावडे, संजय गायकवाड, चंद्रकांत गोरे, नीलेश कड, दशरथ गाडे, राम गोरे, विक्रम शिंदे, जमीरभाई काझी, बाळासाहेब गायकवाड, रमेश गोरे, बाळासाहेब सातपुते, विश्वनाथ पोटवडे, संतोष लोणारी, बाळासाहेब पानसरे, वस्ताद दौंडकर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे प्रांताधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. याबाबत शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर ते वरिष्ठ कार्यालयाला पाठवण्यात येईल, असे प्रांताधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केले. कांदा लिलाव सुरू करावेत असेही प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलन बंद करावे, अशी विनवणी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण, पोलिस उपायुक्त विवेक पाटील, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक वैभव शिंगारे, ज्ञानेश्वर साबळे यांनी केली.

सरकारने अध्यादेश मागे घ्यावा
सरकारने कांदा अनुदानाबाबत ३१ मार्चपर्यंत विकल्या गेलेल्या कांद्याला अनुदान मिळणार असा जो अध्यादेश काढलेला आहे. तो तत्काळ मागे घ्यावा. सरकारने कांद्याला वीस रुपये हमीभाव द्यावा. कांद्याचे भाव हे पाच आणि सात रुपयापर्यंत आलेले असेल तर शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. याचा सरकारने गंभीरपणे विचार करावा. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी त्याला भाव परवडत नाही त्यामुळे तो रस्त्यावर येऊन बसतो तो तीव्र आंदोलन करतो. या शेतकऱ्यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे.
- दिलीप मोहिते पाटील, आमदार,

''शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नये''
सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करावा. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नये. सद्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. सरकारने कांद्याला हमीभाव वीस रुपये द्यावा. तसेच अनुदान देण्याची मुदत वाढवावी, अशी आग्रही मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, बाजार समितीचे संचालक राम गोरे यांनी केली आहे.

05220

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com