इंदोरी-वराळे गटात संभ्रमावस्था
इंदोरी-वराळे जिल्हा परिषद गट
इच्छुकांच्या गोटात संभ्रमावस्था
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांची आरक्षणे जाहीर झाल्यानंतर त्या अनुषंगाने उमेदवारीसाठी इच्छुकांच्या पक्षश्रेष्ठींकडे गाठीभेटी तसेच मतदारांशी संपर्क वाढला आहे. मात्र, महायुती की स्वतंत्र लढत याबाबत अद्याप निर्णय झालेला न झाल्याने इंदोरी-वराळे गटातील इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
- बबनराव भसे
इं दोरी-वराळे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक पुरुष इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. या गटात इंदोरी व वराळे या गणांचा समावेश आहे. आजपर्यंत दोन जणांचा अपवाद वगळता भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. इंदोरी गणात इंदोरी, माळवाडी, सुदुंबरे, सुदवडी, जांबवडे व तळेगाव ग्रामीण ही प्रमुख गावे तसेच भाग येतात; तर वराळे गणात वराळे, नाणोली तर्फे चाकण, नवलाख उंबरे, बधलवाडी, मिंडेवाडी, परीटवाडी, जाधववाडी, आंबी, वारंगवाडी, राजपुरी, साते, मोहितेवाडी, ब्राम्हणवाडी, विनोदेवाडी व जांभूळ ही गावे येतात.
सध्या साधारणपणे भाजपकडे चार तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे दोन प्रबळ इच्छुक उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. दोन्ही पक्षांकडून उमेदवारी कोणास मिळते? त्यावरच लढत रंगतदार होणार की अटीतटीची होईल, याचा अंदाज येईल. मावळात १९९४ ते २०१९ पर्यंत भाजपचे आमदार होते. २०१९ पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असल्याने त्याचा लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारास होईल. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाच्या मातब्बरांनी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केल्याने त्याचा फायदा भाजप उमेदवारास होणार आहे. मात्र, महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली; तर दोन्ही पक्षांत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

