Jejuri Yatra
Jejuri Yatra sakal

Jejuri Yatra : जेजुरीत सोमवतीचा सोनेरी सोहळा

श्री क्षेत्र जेजुरी (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. ८) दुपारी खंडोबाचा सोमवती पालखी सोहळा रंगला होता. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी सोहळा सोनेरी केला. सोमवती यात्रेला सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.

जेजुरी : श्री क्षेत्र जेजुरी (ता. पुरंदर) येथे सोमवारी (ता. ८) दुपारी खंडोबाचा सोमवती पालखी सोहळा रंगला होता. भंडाऱ्याची मुक्त उधळण करत भाविकांनी सोहळा सोनेरी केला. सोमवती यात्रेला सुमारे दोन लाख भाविकांनी गर्दी केली होती.

सोमवारी अमावस्या आली की जेजुरीत खंडोबाची यात्रा भरते. दिवसभर अमावस्या असल्याने भरसोमवती यात्रा भरली होती. दुपारी एक वाजता गडावरून पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी मुख्य मानकरी राजेंद्र पेशवे, सचिन पेशवे, खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, गणेश आगलावे, देवसंस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त ॲड. विश्वास पानसे, ॲड. पांडुरंग थोरवे, पोपटराव खोमणे, मंगेश घोणे, डॉ. राजेंद्र खेडेकर, अभिजित देवकाते आदी उपस्थित होते.

पालखीची मंदिर प्रदक्षिणा सुरु असताना भाविक सज्ज्यावरून पोत्याने भंडारा उधळत खंडोबाचा जयघोष करीत होते. भर उन्हातही खांदेकरी व मानकरी व भाविक गर्दी करून होते. पालखीला सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीवर स्नान घालण्यात आले. परिसरातील शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्याने खंडोबाच्या स्नानासाठी नदीमध्ये डोह तयार केला होता. कऱ्हा नदीच्या पाण्याने व दही दुधाने खंडोबाच्या उत्सवमूर्तींना स्नान घालण्यात आले.

त्यानंतर पालखी धालेवाडी, कोरपडमळा मार्गे सायंकाळी जेजुरीत आली. जानुबाई मंदिरात स्थानिक नागरिकांच्या दर्शनासाठी पालखी ठेवण्यात आली होती. त्यानंतर पालखी रात्री गडावर आणण्यात आली. उत्सवमूर्ती भंडारगृहात ठेवल्यानंतर रोजमारा मारून पालखी सोहळ्याची सांगता झाली. दूरचे भाविक रविवारी रात्रीपासून सोमवारी पहाटेपर्यंत दर्शनासाठी गर्दी करीत होते. सोमवारी पहाटे साडेतीन वाजता मंदिर उघडण्यात आली. त्यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभर रांगा लावून भाविक दर्शन घेत होते. नदीवरही भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

खांदेकऱ्यांसाठी पायमोजे व टोप्या
भर उन्हात पालखी सोहळा असल्याने देवसंस्थाच्यावतीने खांदेकऱ्यांसाठी पायमोजे व टोप्या पुरविण्यात आल्या होत्या. जागोजागी देवसंस्थानच्यावतीने पिण्याचे पाणी, सरबत व नाष्टा पुरविण्यात आला. रात्री खांदेकरी व मानकरी यांच्यासाठी रात्रीच्या महाप्रसादाचे आयोजन केले होते. जेजुरी पोलिसांकडून वाहतूक व पालखी सोहळा सुरळीत करण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे सांगण्यात आले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com