वाढदिवसाच्या बैलगाडा शर्यतींना वेसण

वाढदिवसाच्या बैलगाडा शर्यतींना वेसण

मंचर, ता. २५ : बैलगाडा शर्यतीच्या आयोजनाबाबत नवीन मार्गदर्शक सूचना राज्य सरकारच्या पशुसंवर्धन आयुक्तालयाने परिपत्रक काढून दिल्या आहेत. यामध्ये गावच्या संस्कृती परंपरेनुसार धार्मिक सण, उत्सव, यात्रा यासाठीच बैलगाडा शर्यतींना परवानगी दिलेली आहे. पण, वाढदिवसानिमित्त शर्यती घेता येणार नाहीत, असे म्हटले आहे. त्यामुळे नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा गाजावाजा करून भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतींना ब्रेक बसणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींना परवानगी देताना गुरुवारी (ता. १८) मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्य शासनाने बुधवारी (ता. २४) याबाबत पशुसंवर्धन खात्यामार्फत मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार, याबाबतचा तपशील दिला आहे, अशी माहिती बैलगाडा शर्यतीचा पाठपुरावा शासन दरबारी व सर्वोच्च न्यायालयात सातत्याने करणारे अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप बोदगे यांनी दिली. याबाबत सर्वोच्चन्यायालय व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी प्रत्येक गावात व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

राजकीय कार्यक्रम, वाढदिवस यानिमित्त कोणत्याही परिस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी देऊ नये, असे आदेशामध्ये नमूद केले आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला अनेक इच्छुक नेते मंडळी लागले आहेत. बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून सहज दहा ते वीस हजार लोक जमू शकतात. त्यामुळे नेत्यांनी विविध राजकीय कार्यक्रम, वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यती भरविण्यासाठी जोर लावला होता. अनेक बैलगाडा घाटांना अद्ययावत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या जात होत्या. सर्वोच्च न्यायालय व राज्य शासनाच्या परिपत्रकामुळे राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे आतापर्यंत तयार केलेल्या तयारीवर पाणी पडण्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. पण, या निर्णयाचे मात्र सर्वसामान्य जनतेकडून स्वागत केले जात आहे.

नेते मंडळींना चिंता
आंबेगाव, खेड, जुन्नर, शिरूर-हवेली, मावळ व भोसरी विधानसभा मतदारसंघात नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात होते. विजेत्या बैलगाडा मालकांना लाखो रुपयांची रोख रक्कम, मोटरसायकल, बुलेट, फ्रिज, सोन्याच्या अंगठ्या, आदी वस्तू भेट म्हणून दिल्या जात होत्या. त्यातून नेत्यांना लोकप्रियता मिळत होती. पण, आता मात्र राजकीय कार्यक्रम व नेत्यांच्या वाढदिवसाला बैलगाडा शर्यती भरविण्यास परवानगी मिळणार नाही. त्यामुळे नेते व त्यांचे समर्थक कमालीचे चिंतेत पडल्याचे पाहावयास मिळते.

MAC23B08146

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com