लोणी भापकरमध्ये फळझाडांच्या संख्येत वाढ
मोरगाव, ता. १२ : लोणी भापकर (ता. बारामती) परिसरात फळझाडांचे प्रमाण चांगले वाढले आहे. येथे बांधकाम कंपनी मॅजेस्टिक लँडमार्कच्या मॅजेस्टिक रायझिंग सन एलएलपी यांनी सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्ट लोणी भापकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळझाडे लावली आहेत.
मागील दोन वर्षात प्लांट डोनेशन अँड प्लांटेशन या उपक्रमातून न्यू इंग्लिश स्कूलमधील दहावीच्या तुकडीला सहा ते सात फूट उंचीच्या वेगवेगळ्या फळझाडांचे वाटप केले होते. यामध्ये जांभुळ, आंबा, चिंच, पेरू मुलांनी अतिशय चांगली काळजी घेऊन झाडे जपली आहेत. त्यामुळे परिसरात फळझाडांचे प्रमाण चांगले वाढले आहे. सुपर ट्रेकर्स वेल्फेट ट्रस्ट लोणी भापकर व ग्रामस्थ यांच्यातर्फे कंपनीचे अंकित छाजेड, ॲड. गणेश सारडा, साईट मॅनेजर गौरव मेहता, संभाजी पवार यांचे आभार मानले. सामाजिक बांधिलकी जपत कंपनीने दिलेल्या फळ रोपांचे चांगल्या पद्धतीने संवर्धन केल्याबद्दल सुपर ट्रेकर्स वेल्फेअर ट्रस्टचे सदस्य जयदीप भापकर यांनी कौतुक केले, तर झाडे उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी कंपनीचे आभार मानले.

