दुरुस्तीनंतरही बंधाऱ्यांच्या ढाप्यातून गळती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुरुस्तीनंतरही बंधाऱ्यांच्या ढाप्यातून गळती
दुरुस्तीनंतरही बंधाऱ्यांच्या ढाप्यातून गळती

दुरुस्तीनंतरही बंधाऱ्यांच्या ढाप्यातून गळती

sakal_logo
By

नीरा नरसिंहपूर, ता.२४ : नीरा व भीमा नद्यावरील बंधाऱ्यांच्या दुरुस्तीनंतरही ढाप्यातून पाणी वाहून जात आहे. संगम, गणेशगाव तसेच भाटनिमगाव, टणू परिसरातील बंधारे रिकामे होण्याच्या मार्गावर आहेत. यातील काही बंधारे तीन वर्षे नादुरुस्तीमुळे रिकामे राहिल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच कोट्यवधीची रक्कम खर्चूनही बंधारा दुरुस्त होत नसल्याने शेतकऱ्यांनी जलसंपदा विभाग व ठेकेदाराबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर बंधाऱ्यातून वाहून जाणारे पाणी टिकवण्याची मागणी होत आहे. नीरा नदीवरील संगम, गणेशगाव, ओझरे, लुमेवाडी येथील बंधारे मागील तीन-चार वर्षापूर्वी अतिवृष्टी झाल्याने पाण्याच्या प्रवाहामुळे भराव फुटल्याने नुकसान झाले होते. बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्याने बंधाऱ्यावरील इंदापूर व माळशिरस तालुक्यातील शेतीचे मोठे नुकसान झाले होते. निकृष्ट दर्जाच्या कामाने बंधाऱ्यांची अशी अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू, नरसिंहपूर या बंधाऱ्यांच्या ढाप्यातून पाणी गळती सुरूच आहे. बंधाऱ्यांचे ढापे टाकणाऱ्या ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने हलगर्जीपणाची कामे केली जात आहेत. त्यामुळे बंधाऱ्यांच्या ढाप्यातून पाण्याची गळती मोठ्या प्रमाणात होऊन बंधारे लवकरच रिकामे होत आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सदर बंधाऱ्यांची त्यावेळी पाहणी करून बंधारे तातडीने दुरुस्त करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे कामासाठी एक कोटीपेक्षा जास्त निधी वापरून देखील बंधाऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही. तसेच बंधाऱ्यांच्या इतरत्र सुद्धा मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे बंधाऱ्याच्या अनेक ढाप्यातून पाणी गळती मोठ्या प्रमाणात होत असून बंधारे रिकामे होण्याच्या मार्गावर आहेत. अधिकारी ग्रामस्थांचे फोन घेत नसल्याने तक्रार नेमकी कोणाकडे करायची असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

गळती थांबविण्यासाठी ठेकेदारांचे पैसे वापरा
जनतेच्या पैशाचा अशा प्रकारे अपव्यय करणारे ठेकेदार आणि त्यांना पाठीशी घालणारे अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे. तर नीरा व भीमा नदीवरील बंधाऱ्यांच्या ढाप्यातून होणारी पाण्याची गळती कायमची बंद होण्यासाठी ठेकेदारांच्या पैशाचा वापर करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांनी केली आहे.

03168