चाकण एमआयडीसीत भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीत भारनियमनाची शक्यता

पुणे, ता. २ : चाकण येथील महापारेषणच्या ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रातील ५० एमव्हीए क्षमतेचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने सुमारे १० ते १५ मेगावॉट विजेची तूट निर्माण झाली आहे. त्यासाठी महावितरणकडून भारव्यवस्थापनाचे प्रयत्न सुरु असून विजेची मागणी अधिक असल्याने गरज भासल्यास चाकण एमआयडीसीमधील काही वीजवाहिन्यांवर तात्पुरते भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे, असे महावितरणकडून कळविण्यात आले आहे.
महापारेषणच्या चाकण येथील ४०० केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्रामध्ये प्रत्येकी ५० एमव्हीए क्षमतेचे तीन पॉवर ट्रान्सफॉर्मर आहेत. त्यातून चाकण एमआयडीसीला ११० मेगावॉट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एका पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला. तपासणी केल्यानंतर तो पूर्णतः नादुरुस्त झाल्याचे आढळून आले. त्यानंतर महापारेषणकडून नवीन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, या कामासाठी येत्या मंगळवारपर्यंत (ता. ६) कालावधी लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, महापारेषणच्या या उपकेंद्रातील उर्वरित दोन पॉवर ट्रान्सफॉर्मरवर नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरचा वीजभार टाकण्यात आला आहे. सध्या विजेची मागणी वाढली आहे व उर्वरित १० ते १५ मेगावॉट विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहे. गरज भासल्यास नाणेकरवाडी, कुरुळी, एमआयडीसी, सारा सिटी, फोर्स मोटर्स, चिंबळी, आळंदी फाटा व खालुंब्रे या २२ केव्ही वीजवाहिन्यांवर दिवसा चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागणार आहे. या सर्व वीजवाहिन्यांवर उच्चदाबाचे ७४ आणि लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणिज्यक व औद्योगिकचे ३ हजार ८५० असे एकूण ३ हजार ९२४ ग्राहक आहेत. विजेच्या भारनियमनाची गरज भासल्यास संबंधित वीजग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

होर्डिंग्जमुळे ४६ हजार ग्राहकांची वीज खंडित
चाकण शहर व परिसरात गुरुवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पूर्व मोसमी पावसामुळे विविध ठिकाणी लावलेल्या मोठमोठ्या होर्डिंग्ज महावितरणच्या अनेक वीजवाहिन्यांवर पडल्याने चाकण शहर व एमआयडीसी परिसरातील सुमारे ४६ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. विशेष म्हणजे यातील ९० टक्के ग्राहकांचा वीजपुरवठा केवळ होर्डिंग्जमुळे तर उर्वरित १० टक्के वीजपुरवठा मोठी झाडे व फांद्या यंत्रणेवर पडल्यामुळे खंडित झाल्याचे निदर्शनास आले. सायंकाळनंतर महावितरणकडून वीज यंत्रणेवरील होर्डिंग काढणे व वीजतारांची दुरुस्ती करण्याचे काम सुरू होते. शुक्रवारी पहाटे तीन वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने सर्वच ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र वादळामुळे उडालेले फ्लेक्स वीजवाहिन्यांच्या तारांवर पडल्याने चाकणमधील घरगुती, वाणिज्यक व औद्योगिक वीजग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा फटका बसला असल्याचे महाविरणकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com