प्रत्येक फेरीत उत्कंठा शिगेला

प्रत्येक फेरीत उत्कंठा शिगेला

पुणे, ता. ४ : एक, दोन, तीन अशा प्रत्येक फेरीत सुप्रिया सुळे (ताई) यांच्या वाढत जाणाऱ्या मताधिक्‍याने कार्यकर्ते सुखावले, इकडे अजित पवार (दादा) व - सुनेत्रा पवार (वहिनी) यांच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरील ताण आणखी गडद झाला, तेवढ्यात सातव्या फेरीमध्ये अचानक सव्वा सातशे मतांची वहिनींना आघाडी मिळाली आणि कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘तुम्ही बघाच, खडकवासला कसा ताईंचा लिड तोडतोय ते,’ दादा- वहिनींच्या कार्यकर्त्यांमधील हा दांडगा उत्साह क्षणभंगुर ठरला. पुढच्या बहुतांश फेऱ्यात ताईंच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोचत असताना इकडे दादा- वहिनींच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर मात्र मळभ दाटण्यास सुरुवात झाली. ताईंनी एक लाखांचा टप्पा पार करताच, कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत त्यांच्या नावाच्या घोषणा दिल्या.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये थेट बारामती लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने थेट लढत होती. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील कार्यकर्त्यांमध्ये त्यावरुन जोरदार रस्सीखेच सुरू होती. मंगळवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे यांनी ६९४१ मतांची आघाडी घेतली. मताधिक्‍याने सुरुवात झाल्याने ताईंच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हसू झळकले. त्यानंतर दुसऱ्या फेरीची आकडेवारी घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांनी आकड्यांची जुळवाजुळव केली, दुसऱ्या फेरीतही सुळे यांना साडे चार हजारांची आघाडी मिळाली, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या, सहाव्या फेरीपर्यंत ताईंना मताधिक्‍य मिळत गेल्याने मतमोजणी केंद्रावरील त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंद उसळू लागला.
तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढू लागला. मात्र, सातव्या फेरीमध्ये बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर यांनी ताईंना दिलेली साथ कमी पडत असताना आणि तिकडे भोर व खडकवासला मतदारसंघानी मात्र वहिनींना साथ दिल्याने या फेरीत वहिनींनी ७२९ मतांची आघाडी मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही.
केंद्रामधील प्रत्येक बुथवर व्यवस्थित आकडे नोंदवून घेतल्यानंतर त्यांची बेरीज झाल्यानंतर अंतिम आकडेवारी पक्षाच्या मुख्य नोंदणी करणाऱ्या पदाधिकाऱ्याकडे देण्याचे काम प्रतिनिधी करत होते. प्रत्येकाची घाईगडबड सुरू होती. कमीत कमी वेळेत सर्वांना माहिती कशी पोचले, यासाठी कार्यकर्त्यांची धडपड सुरू होती. पुढच्या प्रत्येक फेऱ्यांमध्ये ताईंना मिळणाऱ्या मताधिक्‍यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा आनंद पसरला. इकडे भोर, खडकवासला विधानसभा मतदारसंघावर भिस्त असणाऱ्या दादा व वहिनींच्या कार्यकर्त्यांकडून ‘खडकवासला ताईंचे लिड नक्कीच तोडणार’ हा आत्मविश्‍वास एकमेकांना बळ देत होता. परंतु, त्यानंतरही खडकवासला मतदारसंघामध्ये वहिनींना चांगली मते मिळत असताना, दुसरीकडे अन्य मतदारसंघ मात्र ताईंच्या पाठीशी उभे राहिले. चौदाव्या फेरीनंतर दादा- वहिनींच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह संपला, सुप्रिया सुळे यांची विजयाकडे वाटचाल होऊ लागली. त्यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त केला जाऊ लागला, तर दादांचे कार्यकर्त्यांनी मात्र मतमोजणीकडे अधिक गांभीर्याने लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्यकर्त्यांमधील उत्साह मावळला. तर सुळे यांच्या कार्यकर्त्यांनी शेवटी ताईंच्या व शरद पवार यांच्या नावाच्या घोषणा देत विजयाचा आनंद साजरा केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com