अनधिकृत वाहतूक; विद्यार्थ्यांना धाकधूक

अनधिकृत वाहतूक; विद्यार्थ्यांना धाकधूक

Published on

अविनाश ढगे : सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ३० : ‘स्कूल व्हॅन’चा परवाना नसतानाही बेदरकारपणे गाडी चालवली जात असल्याची घटना शहरात काही महिन्यांपूर्वी उघडकीस आली. यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जुजबी कारवाई केली. नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या अनधिकृत वाहतुकीकडे वाहतूक पोलिसही दुर्लक्ष करत आहेत. शहरात एखादी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का ? अशा प्रश्‍न उपस्थित होत आहे.
बदलापूरमध्ये गुरुवारी (ता. २२) शाळेतून घरी परतत असताना स्कूल व्हॅनमध्ये चालकानेच चिमुकलीवर अत्याचार केला. या घटनेमुळे शालेय विद्यार्थी वाहतुकीचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या मुली सुरक्षित आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागात तीन हजारांहून अधिक स्कूल बस आणि व्हॅनची नोंद आहे. शहरात बस, व्हॅन आणि रिक्षांमधून क्षमतेपेक्षा जादा विद्यार्थ्यांची वाहतूक सुरू आहे. अनेक चालकांकडे वैध योग्यता प्रमाणपत्र नाही, वाहनांमध्ये परिचालक, अग्निशामक यंत्रणा नाही. सर्व नियम धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. या वाहनांच्या मालक आणि चालकांवर कारवाई अपेक्षित आहे. मात्र, वाहतूक संघटनांच्या दबावाला बळी पडून दोन्ही यंत्रणा या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत, असा आरोप होत आहे.

शाळा स्तरावर नियमांकडे दुर्लक्ष
स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, वाहतूक नियमावलीच्या कठोर अंमलबजावणीसाठी शाळा स्तरावर ‘परिवहन समिती’ स्थापन केली जात होती. या समितीकडून बसचे शुल्क, बसथांबे, वाहनांची कागदपत्रे, नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, वाहन परवाना यावर लक्ष ठेवले जात होते. मात्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात परिवहन समितीसह इतर पाच समित्या एकत्रित करून ‘विद्यार्थी सुरक्षा व ‘भौतिक सुविधा विकसन समिती’ स्थापन करण्याचे निर्देश दिले. पूर्वी परिवहन समितीत असलेल्या मोटार वाहन निरीक्षकाला नवीन समितीतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे विद्यार्थी सुरक्षेचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला असून वाहतूक नियमावलीची शाळास्तरावर नियमानुसार अंमलबजावणी होताना दिसून येत नाही.

चालकाची चारित्र्य पडताळणी होते काय?
विद्यार्थी वाहतुकीच्या बस शाळेच्या मालकीच्या असल्यास चालकाची नेमणूक शाळा प्रशासनाकडून केली जाते. बस ठेकेदारांच्या असल्यास चालकांची नेमणूक ठेकेदारांकडून होते. अशा वेळी चारित्र्य पडताळणी जबाबदारी शाळा प्रशासन आणि ठेकेदार या दोघांचीही असते. मात्र, बहुतांश वेळा चालकांची नेमणूक करताना केवळ परवाना आणि बॅज बघितला जातो. इतर तपासणीच होत नसल्याची स्थिती आहे.

वाहनांमध्ये परिचालक बंधनकारक
विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी, चढ-उतार करण्यासाठी अशा वाहनांमध्ये महिला परिचालक बंधनकारक आहे. मात्र, बहुतांश स्कूल बसमध्ये परिचालक नसतात. तर स्कूल व्हॅनमध्ये तर हे कर्मचारीच नसतात. त्यामुळे बस किंवा व्हॅनमधील मुले खिडकीबाहेर डोकावणे, हात बाहेर काढणे, असे प्रकार करतात.

‘आरटीओ’कडून तपासणी होते का?
शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसला दरवर्षी फिटनेस चाचणी बंधनकारक आहे. ‘आरटीओ’कडून शालेय वाहनांची फिटनेस चाचणी करून योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. मात्र, त्यानंतर नियमित तपासणी होत नाही. वाहतूक पोलिसांसमोर विद्यार्थ्यांची क्षमतेपेक्षा अधिक वाहतूक होते. पण, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते. एखाद्या अपघातानंतर जुजबी कारवाई केली जाते. नंतर पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होते.

स्कूल व्हॅन, रिक्षांना नियम नाहीत का?
शहरात बसव्यतिरिक्त व्हॅन व रिक्षांमधूनही शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. स्कूल वाहनांमध्ये परिचालक, अग्निशमन यंत्रणा, वाहनांना पिवळा रंग, आपत्कालीन दरवाजा, खिडकीबाहेरील बाजूस आडवे लोखंडी बार यांसह विविध नियम लागू आहेत. पण, यातील काही वाहनांचे मालक नियमांचे पालन करत नाहीत, ही स्थिती आहे.

शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन शालेय विद्यार्थी बस व व्हॅनची तपासणी केली जात आहे. दोषींवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड

PNE26V91069

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com