
बांदल, देवकर, पठाण यांना मुळशी गौरव पुरस्कार जाहीर
पिरंगुट, ता. १५ : मुळशी तालुक्यातील शिवराय फाउंडेशनच्यावतीने देण्यात येणारे ‘मुळशी गौरव’ पुरस्कार जाहीर झाले असून, शुक्रवारी (ता. १७) त्याचे वितरण होणार आहे. राजर्षी शाहू महाराज मुळशी गौरव पुरस्कार पेरिविंकल शाळेचे संस्थापक राजेंद्र भगवान बांदल यांना; तर राजमाता जिजाऊ मुळशी गौरव पुरस्कार शिल्पा गणेश देवकर यांना जाहीर झालेले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई मुळशी गौरव पुरस्कार संपर्क माध्यमिक विद्यालय भांबर्डे येथील रफिक अब्दुल कादर पठाण यांना; तर कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ मुळशी गौरव पुरस्कार गिता महेश मालुसरे व रुद्र नरेंद्र सातपुते यांना देण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव चंद्रकांत लामखडे यांनी दिली.
याबाबत फाउंडेशनचे अध्यक्ष राहुल ओझरकर म्हणाले, ‘‘रिहे (ता. मुळशी) येथील भैरवनाथ विद्यालयाच्या प्रांगणात शिवजयंती साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त सकाळी प्रभातफेरी, गाथा पूजन व दीप प्रज्वलन झाल्यानंतर सकाळी ९.४५ ते ११.१५ या कालावधीत प्रा. सोमनाथ गोडसे यांचे ‘छत्रपती शिवराय काल आणि आज’ या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर शालेय बक्षिस वितरण समारंभ होईल.’