मुळशीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची कानउघाडणी

मुळशीतील राष्ट्रवादीच्या नेत्यांची कानउघाडणी

पौड, ता. ५ : मुळशी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेल्या ‘फ्री स्टाइल’ हाणामारीवरून पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात पक्षाच्या झालेल्या बैठकीत आपल्या शैलीत पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.
बुधवारी (ता. २४) माले (ता. मुळशी) येथील एका मंगल कार्यालयातील एका लग्नाच्या व्यासपीठावर जिल्हा बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आणि पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे यांच्यात प्रथम शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर त्याचे रूपांतर ‘फ्री स्टाइल’ हाणामारीत झाले. मुळशी तालुक्याच्या विविध गावांतून आलेल्या वऱ्हाडी मंडळीसमोर अचानकच हा प्रकार झाल्याने सर्वजण गोंधळून गेले. त्यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे काही पदाधिकारीही त्याठिकाणी उपस्थित होते. त्यातील काहींनी पुढाकार घेऊन वातावरण शांत केले. दोघांनीही याबाबत पौड पोलिसांकडे एकमेकाविरोधात तक्रार अर्ज दिले. तथापि, या भांडणाची काही क्षणातच तालुकाभर चर्चा रंगली.
दरम्यान, हाणामारीची ही माहिती अजित पवार यांच्या कानावर गेली. सोमवारी (ता. ५) राष्ट्रवादीच्या जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुण्यात होती. यावेळी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी, मुळशीतील राष्ट्रवादीचे विविध पदांवरील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत भाषण करताना पवार यांनी मुळशीच्या हाणामारीचा उल्लेख करीत उपस्थित सर्वांनाच चांगली तंबी दिली. ते म्हणाले, ‘‘मुळशीच्या लोकांना पदे दिलीय, तर भांडायचे नाही. तुम्ही भांडता पण बदनामी राष्ट्रवादीची, पवारसाहेबांची होते. हा कुठला फाजीलपणा चाललाय? तुम्हाला दिलेल्या पदाचा राजीनामा घेईन. मी फार टोकाचे वागेन.’’
अजित पवार यांच्या या तंबीने मुळशी तालुक्यासह इतर तालुक्यातील एकमेकांवर कुरबुरी करणाऱ्या राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चांगलाच धडा मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com