

राहू, ता. ११ : पुणे, पिंपरी चिंचवड शहरातून वाहत येणाऱ्या मुळा व मुठा या दोन नद्यांच्या पाण्यामध्ये शहरातील सांडपाणी व रसायन मिश्रित कंपन्यांतील पाणी प्रक्रिया न करताच नदी पत्रात सोडले जाते. नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीची वाढ झाली असून, पवित्र अशा नदीला गटारगंगेचे स्वरूप आले आहे.
दौंड तालुक्यातील वाळकी बेट संगम येथे मुळा- मुठा नदीला भीमा नदी मिळत असल्यामुळे भीमेला देखील नरकयातना सोसाव्या लागत आहेत. मुळा- मुठा व भीमा या दोन नद्या दौंड तालुक्यातून बारमाही वाहत असल्यामुळे तालुक्याला निसर्गाचे वरदान लाभले आहे. या दोन्ही नद्यांमुळे तालुका बारमाही बागायती झाला. मात्र, या नद्यांमध्ये कारखान्यांमधील रसायनमिश्रीत पाणी प्रक्रिया न करताच सोडण्यात येत असल्याने नद्यांची अवस्था दयनीय झाली आहे. याचा गंभीर परिणाम नदी पात्रातील जलचरांवर व पिकावर होताना दिसत आहे.
मुळा- मुठा नदीमध्ये दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसात अनेक कंपन्यांमध्ये साठवून ठेवलेले पाणी सोडण्यात येत असल्याने अनेक मासे मृत्युमुखी पडत असून, असंख्य जलचरांच्या जाती नामशेष झाल्या आहेत. नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा वाढ होत असल्याने या नदीचे पाणी दरवर्षी पावसाळ्यानंतर खराब होत आहे. नदीमध्ये जलपर्णीची वाढ होऊन त्या कुजत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून, पांढऱ्या डासांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. डासांमुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना व पशुधनास त्रास सहन करावा लागत आहे.
जनावरांसाठी कापडी जाळ्या, गोठ्यात पंखे
मुळा- मुठा आणि भीमा नदीच्या कडेला अनेक गावे वसली आहेत. वाढलेल्या जलपर्णीमुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गोठ्यात पंखे व गोठ्याला कापडी जाळ्या बसवल्या आहेत.
दरवर्षी नदी सुधारणा प्रकल्पाविषयी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, ग्रामीण भागामध्ये जलपर्णीचा विनाश करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलले जात नाही. ही खेदाची बाब आहे. याचा देखील प्रशासनाने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.
- बाळासाहेब थोरात, माजी सभापती, दौंड कृषी उत्पन्न बाजार समिती
मुळा-मुठेची अवस्था दयनीय झाली असून, भीमा नदीला देखील मुळा- मुठा नदीमुळे जलपर्णीचा वाण मिळाला आहे. भीमेच्या पात्रात जलपर्णीची वाढ झाली असून, नद्यांचे पावित्र्य धोक्यात आले आहे. नदीमध्ये सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडावे. याबाबत जलसंपदा विभागाने तातडीने लक्ष देऊन नदीपात्रातील जलपर्णी काढण्यासाठी प्रयत्न करावेत.
-सागर शेलार, जिल्हा परिषद सदस्य
03738
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.