राजगुरू स्मारकासाठी लक्षवेधी

राजगुरू स्मारकासाठी लक्षवेधी

राजगुरुनगर, ता. १६ : हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या वाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम रेंगाळल्याने त्याची अंदाजपत्रकीय रक्कम दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या स्मारकाच्या अंदाजपत्रकाची रक्कम ८६ कोटींवरून आता १४० कोटींवर गेली आहे. आतातरी शासन या अधिवेशनात या स्मारकाला निधी उपलब्ध करून देणार का? अशी लक्षवेधी आमदार दिलीप मोहिते यांनी विधानसभेत उपस्थित केली.
हुतात्मा राजगुरू, भगतसिंग, सुखदेव तरुण वयात देशासाठी बलिदान दिले. या बलिदानातून आपण आजचे स्वातंत्र्य अनुभवत व उपभोगत आहोत. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेला राजगुरुवाडा आहे. शासनाने त्याला संरक्षित स्मारक म्हणून दर्जा दिलेला आहे. परंतु, देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनदेखील हुतात्मा राजगुरू यांचे स्मारक उभे राहू शकलेले नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून याबाबतच्या निधीच्या घोषणा झाल्या. परंतु, निधी प्रत्यक्षात मिळालाच नाही. शासनाने ८६ कोटींचा हुतात्मा राजगुरू स्मारक विकास आराखडा केला, मात्र तो कागदावरच राहिला. आता त्याच आराखड्याची किंमत १४० कोटी रुपयांपर्यंत गेलेली आहे. शासन २३ मार्च या बलिदानदिनी निधी देऊन या हुताम्यांना श्रद्धांजली देणार का? असा प्रश्न आमदार मोहिते यांनी विधानसभेत उपस्थित केला.
त्याला उत्तर देताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन महिन्यात आमदार मोहिते यांची समितीवर नेमणूक करून या राजगुरू स्मारक विकास आराखड्याला मान्यता देणार, असे सांगितले. त्याचबरोबर जो अधिकारी यात कुचराई करील, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विकास आराखड्याला या अधिवेशनात निधी देणार का? तसेच बलिदान दिन व जयंती साजरी करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार का? हुतात्मा राजगुरू यांच्या स्मारकाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देणार का? असे प्रश्न उपस्थित केले. याला भाजप प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर यांनी देखील पाठिंबा दर्शविला. या विकास आराखड्याचे टप्पे तयार करून त्याचा कालावधी पूर्ण होईल, हे तरी मंत्री महोदय या सभागृहाला आश्वासित करतील का? असे त्यांनी विचारले.

मागणीसाठी निदर्शने
या लक्षवेधीनंतर आमदार मोहिते व आमदार अशोक पवार यांच्यासह राजगुरुनगर येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. नीलेश आंधळे, मधुकर गिलबिले, शुभम सोनवणे, सिद्धार्थ कांबळे, दिलीप बनसोडे, मयूर कानवडे आदींनी मंत्रालयाजवळील हुतात्मा राजगुरू चौकात जाऊन स्मारकाला निधी उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी निदर्शने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com