इंदापुरातील प्रशासन रिक्त पदांमुळे खिळखिळे

इंदापुरातील प्रशासन रिक्त पदांमुळे खिळखिळे

इंदापूर, ता. २० : ‘‘इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी असताना गेली आठ वर्षे तालुक्यात एक इंचही सिंचन क्षेत्राची वाढ झालेली नाही. रोजगार नाही. सहकारी संस्था स्थापन झाली नाही. उद्योग नाही. आरोग्य सुविधांची कामे झाले नाहीत. एवढेच काय तर प्रशासन रिक्त जागांमुळे खिळखिळे झाले असून, सर्वसामान्य माणसांची कामे होत नाहीत,’’ असा आरोप माजी मंत्री तथा भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांचे नाव न घेता केला.
इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी विलास वाघमोडे, शरद जामदार, मारुती वणवे, उदयसिंह पाटील, शकील सय्यद, अशोक शिंदे उपस्थित होते. हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘इंदापूर शहरातील मालोजीराजे गढीच्या पुनर्जीवन व संवर्धनासंदर्भात सन २०१२-१३ मध्ये आम्ही पाहणी केली, मात्र त्यावेळी जागेवरून झालेली मतभिन्नता, त्यानंतर लागलेल्या आचारसंहितेमुळे कामे होऊ शकले नाहीत. मात्र, मागील महिन्यात शिवभक्तांशी चर्चेतून स्मारक कुठे करायचे, याबाबत जागेचा प्रश्न निकाली निघाल्याने पुरातत्त्व विभाग, सांस्कृतिक विभाग महसूल विभाग या सर्वांकडे स्वतः भेट घेऊन गढी संदर्भात मागणी केली. या सर्वांची माहिती कळताच विद्यमान आमदार यांनी एक लक्षवेधी मांडली. आठ वर्षे आमदार, अडीच वर्षे मंत्री असलेल्यांना जाग आली. मात्र, प्रत्यक्षात गढीची जागा कुठे आहे, हेही त्यांना माहीत नाही. गढीच्या कामात आम्ही कसलंही राजकारण करणार नाही. संवर्धन करणे, ही लोकप्रतिनिधी या नात्याने तुमची जबाबदारी असून, तुम्हाला आमचं सगळं सहकार्य असेल. सन २०२४ पर्यंत तर तुम्हाला निवडून दिलेले आहे. तोपर्यंत तरी किमान काम मार्गी लावा.’’

आठ वर्षाच्या काळात तालुक्याचा कसलाही विकास झालेला नसताना अडीच वर्षाच्या मंत्रिपदाच्या काळात तालुक्यातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मात्र, या माध्यमातून झालेले रस्ते किती दर्जेदार उत्तम गुळगुळीत आणि ठेकेदार पोसणारे झाले?
- हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री

‘येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन अटळ’
इंदापूर येथे भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये येणाऱ्या काळात सर्व निवडणुका भाजप ताकदीने लढविणार असून, डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाणार आहे. या माध्यमातून येणाऱ्या निवडणुकीत निश्चित परिवर्तन घडेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com