बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

बदनामी करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

इंदापूर, ता. ३ : इंदापूर येथील दिवंगत स्वातंत्र्यसैनिक नारायणदास रामदास शहा यांच्या नावाने वारंवार अपमानास्पद मजकूर आणि अपशब्द वापरून सोशल मिडीयावर व्हायरल करून त्यांचे चारित्र्यहनन करणाऱ्या व त्यातून सामाजिक सलोखा बिघडविणाऱ्या समाजकंटक व काही असामाजिक तत्त्वांवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
याबाबत इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना निवेदन दिले आहे. त्यानुसार, एक महिन्यापासून नारायणदास शहा यांचे चारित्र्यहनन करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयावर टाकल्या जात आहे. फेसबुकवर ‘स्वच्छ इंदापूर शहर, इंदापूर नगरपरिषद महासंग्राम’ या ग्रुपवरून त्यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक, घाणेरडे, आक्षेपार्ह व चुकीच्या पोस्ट जाणीवपूर्वक पसरविल्या जात आहे.
काही नतद्रष्ट मंडळी विशिष्ट स्वार्थी हेतूने त्यांच्यावर व त्यांच्या कुटुंबीयांवर चिखलफेक करण्याच्या उद्देशाने विकृत, खोडसाळ मजकूर सोशल मिडीयावर टाकत आहेत. या बाबींचा गांभिर्याने विचार करावा. सखोल तपास करून संबंधित ग्रुपवर कायमस्वरूपी बंदी आणावी व असा मजकूर टाकून सामाजिक स्थैर्य बिघडवू पाहणाऱ्या या समाजकंटकांवर कडक कायदेशीर कारवाई करावी.
या निवेदनावर इंदापूर नगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, माजी गटनेते गजानन गवळी, माजी नगरसेवक गणेश महाजन, सामाजिक कार्यकर्ते अर्शद सय्यद, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, अशोक चव्हाण, पुंडलिक बानकर यांच्यासह अनेकांच्या सह्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com