Sun, October 1, 2023

वादळी वाऱ्यामुळे पानसरेवाडीत नुकसान
वादळी वाऱ्यामुळे पानसरेवाडीत नुकसान
Published on : 5 June 2023, 3:53 am
सुपे, ता. ५ : पानसरेवाडी (ता. बारामती) परिसरात रविवारी (ता. ४) सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे सौर पॅनेल, झाडे, शेततळ्याचे कागद, पत्रे उडून नुकसान झाले.
या वादळी वाऱ्यामुळे उत्तम संभाजी पानसरे या शेतकऱ्याच्या विहिरीवरील वीजपंपासाठीचा सौर पॅनेल उडून बाजूला पडून नुकसान झाले. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेतून हा पॅनेल बसवला होता. या नुकसानीचा पंचनामा तलाठी नितीन यादव यांनी केला. येथील बोबडे मळ्यातील वीजेचे तीन खांब पडल्याची माहिती सरपंच राजेंद्र पानसरे, सदस्य सचिन कदम यांनी दिली. दत्तात्रेय गणपत धायगुडे यांच्या लिंबाच्या बागेतील २० झाडे पडली. शेततलावातील कागद उडून नुकसान झाले. तर, काळखैरेवाडी रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या कुक्कुट पालन शेडवरील पत्रे उडून नुकसान झाले.