
सिद्धीच्या पहाडावरील ४०० झाडे जळून खाक
शिरूर, ता. २ : येथील सिद्धीच्या पहाडावर फुलविण्यात आलेल्या सिद्धेश्वर वनीकरणाला आज दुपारी अज्ञाताने आग लावल्याने वाळलेल्या गवताबरोबर सुमारे तीनशे ते चारशे मोठी झाडे जळून खाक झाली. वनीकरणच्या कार्यकर्त्यांसह नगर परिषदेच्या अग्निशमन यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
सिद्धेश्वर वनीकरण संस्थेच्या सुमारे शंभरावर कार्यकर्त्यांनी श्रमदानातून, सिद्धीच्या पहाडावर सुमारे २५ हजार वृक्ष लावले आहेत. संस्थेचे कार्यकर्ते त्यासाठी दररोज सकाळी दोन तास व संध्याकाळी दोन तास श्रमदान करतात. आज दुपारी बाराच्या सुमारास वनीकरणाला आग लागल्याचे समजल्यावर तुषार वेताळ, संदीप कडेकर, अनिल बांडे, संतोष साळी, साहेबराव तांबोळी, दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा वाळलेल्या गवतामुळे आग भडकली होती. तातडीने नगर परिषदेच्या अग्मिशमन दलाला कळविल्यानंतर आगीचा बंब घटनास्थळी दाखल झाला. त्याने आगीवर पाण्याचा मारा केल्याने आग आटोक्यात आली. तीन ते चार वर्षे वयाची लिंब, पिंपळ, वड व इतर फुलझाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असल्याचे तुषार वेताळ यांनी सांगितले.