शिरूर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये

शिरूर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये

शिरूर, ता. १७ : शिरूर शहर व परिसरातील गैरधंद्यांबाबत सामान्य नागरिकांकडून ओरड सुरू झाल्यानंतर शिरूर पोलिस ‘ॲक्शन मोड’मध्ये आले असून, गेल्या दोन दिवसांपासून बेकायदा दारू, मटक्याच्या धंद्यांवर पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. त्याचबरोबर तरूणांच्या हुल्लडबाजीचे अड्डे झालेल्या शहरातील तीन कॅफेंवरही कारवाई केली.
शिरूर शहरातील अनेक कॅफे हाऊसमध्ये तरुणांचा धांगडधिंगा चालत असल्याच्या आणि अनेक कॅफे हाऊस चालकांनी आपापल्या कॅफेमध्ये अंतर्गत अडोसे केल्याने तेथे शाळा-महाविद्यालयातील मुला-मुलींचे चाळे चालत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने शिरूर पोलिसांच्या पथकाने मंगळवारी (ता. १७) दिवसभरात शहरातील अशा तीन कॅफेचालकांवर कारवाई केली. शहरातील बाबूराव नगर येथील ‘हक्झोगोन कॅफे’चे चालक अजय हनुमंत रासकर (रा. पिंपळनेर, ता. पारनेर, जि. नगर), रेव्हेन्यू कॉलनी येथील ‘युनिक कॅफे’चे विजय उत्तम गाजरे (रा. रामलिंग रोड, शिरूर) व शिरूर मार्केट यार्डसमोरील ‘टेन इलेवन कॅफे’चे मालक उमेश संजय जाधव (रा. मार्केट यार्ड समोर, शिरूर) यांच्याविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या कॅफे चालकांनी त्यांच्या कॅफे सेंटरमध्ये अंतर्गत अवैधरीत्या पार्टिशन करून शाळा-कॉलेजमधील मुला-मुलींना असभ्य व अश्लील वर्तन करण्यास मुभा देऊन हॉटेलच्या बैठक व्यवस्थेत बेकायदेशीर बदल केला होता. त्यामुळे पोलिसच फिर्यादी झाले व अशा कॅफेचालकांविरूद्ध कारवाई केली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी दिली.
आमदाबाद फाटा (ता. शिरूर) येथील ओमकार ढाब्याच्या आडोशाला बेकायदेशीरपणे दारूच्या बाटल्या विकणाऱ्या चिंतामण रघुनाथ बेंडारी (रा. बेंडारवाडी, ता. मुरबाड, जि. ठाणे) याला मंगळवारी रात्री अटक केली. त्याच्याकडून सात हजार ५७५ रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
शिरूर शहरातील जुगार, मटक्याच्या अड्ड्यांबाबतच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी बुधवारी डंबेनाला परिसरात दोन मटक्याच्या अड्ड्यांवर छापे टाकले. शंकर ज्ञानोबा चांदमाने (रा. पाबळ फाटा, शिरूर) व संतोष सुनील अहिरे (रा. सिद्धार्थ नगर, शिरूर) हे डंबेनाला परिसरात स्वतंत्ररीत्या मटक्याचे अड्डे चालवत होते. त्यांच्याकडून सुमारे चार हजार रुपये रोख व इतर काही वस्तू जप्त केल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com