शिरूरमधील अवघे जनजीवनच निःशब्द
शिरूर, ता. २९ : पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे गुरुवारी (ता.२९) शिरूरमधील गजबजलेली बाजारपेठ शांत झाली आणि शिरूरचे अवघे जनजीवनच निःशब्द झाले होते. शिरूरकरांनी उत्स्फूर्त बंद पाळत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
अजित पवार यांच्या जाहीर सभांनी धडाडणाऱ्या पाच कंदील चौकाच्या परिसरात अक्षरशः सन्नाटा पसरला होता. शिरूरकर नागरीकांनी शांतता फेरी काढून दादांना श्रद्धांजली वाहिली. पाच कंदील चौकात झालेल्या छोटेखानी श्रद्धांजली सभेला उपनगराध्यक्ष मितेश गादिया, माजी नगराध्यक्ष राजेंद्र क्षीरसागर, माजी उपनगराध्यक्ष पोपट ओस्तवाल याच्यासह अभिजित पाचर्णे, सुनील जाधव, नीलेश गाडेकर, एजाज बागवान, नीलेश पवार, सागर नरवडे आदी नगरसेवकांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. खिदमत फाउंडेशन, भूमिपुत्र प्रतिष्ठान, हलवाई चौक गणेश मंडळ, शिरूर तालुका कुंभार समाज, सराफ असोसिएशनच्या वतीने दादांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनेकांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. सुशांत कुटे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश घोगरे यांनी उपस्थितांचे ऋण व्यक्त केले.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी (२८ नोव्हेंबरला) याच पाच कंदील चौकात अजित पवार यांची सभा झाली होती. आज त्याच चौकात त्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आल्यामुळे अनेकजण हळहळले. अजितदादांनी शिरूर शहर व तालुक्यातील विकासासाठी कायमच सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिल्याचे अभिजित पाचर्णे यांनी सांगितले.
दरम्यान, तालुक्यातील न्हावरे, मांडवगण फराटा, कवठे येमाईसह अनेक गावांत बंद पाळून दादांच्या मृत्युप्रती सहवेदना प्रकट करण्यात आल्या.
06081
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

