सासवडचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळित

सासवडचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळित

सासवड, ता. २५ : येथे उन्हाळ्याच्या झळा बसतानाच व वीज गायब होण्याच्या अवकाळी धक्क्याने पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. वीर धरणाहून येणाऱ्या जलवाहिन्यातील कांबळवाडी (ता. पुरंदर) येथे वीज पुरवठा करणाऱ्या विद्युतवाहिन्यांचे अकरा खांब बुधवारी (ता. २४) दुपारी पडल्याने वीज पुरवठा बंद झाला. तेव्हापासून गुरुवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजेपर्यंत वीज पुरवठा व सासवड शहराकडे येणारा पाणी पुरवठाही १८ तास बंद झाला होता. या अडथळ्यामुळे पाणी पुरवठा बहुतांशी विस्कळित झाला आहे. कदाचित हे विस्कळित पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा सुस्थितीत येण्यासाठी दोन ते तीन दिवसांची कसरत नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागास करावी लागेल, अशी शक्यता आहे.
याबाबत सासवड नगरपालिकेचे पाणी पुरवठा अभियंता रामानंद कळसकर यांनी सांगितले की, सासवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीर धरणाचे पाणी आणणाऱ्या जलवाहिन्यांमध्ये वीर धरणावरील जॅकवेल, कांबळवाडी संपवेल आणि सासवड पाणी पुरवठा केंद्र या तिन्ही ठिकाणी एकसाथ वीज पुरवठा सुरळीत लागतो. वीर धरण व सासवडला वीज पुरवठा होता. परंतु, बुधवारी वादळी वाऱ्यासह कांबळवाडी ते वीर परिसरात पाऊस झाला. त्यामध्ये दोन वीजेचे खांब पडले. तेव्हापासून १८ तास वीज पुरवठा खंडित होता. त्यातून आवश्यक पाणी संचय न झाल्याने गुरुवारी सकाळी ज्या भागाला पाणी पुरवठा दिला जाणार होता, त्यातील काहींना तो दिला गेला नाही. गुरुवारी सायंकाळी ज्यांना पाणी पुरवठा होणार होता, तोही पुढे गेला आहे. शुक्रवारी ज्यांना पाणी येणार होते, त्यांचे पाणी वितरणही शनिवारवर गेले आहे. हे विस्कळित झालेले पाणी पुरवठा वेळापत्रक जागेवर येण्यास दोन दिवस कालावधी लागेल. या विस्कळित वेळापत्रकाचा फटका सासवड शहरातील पुणे मार्गावरील विविध सोसायट्या, वाढीव हद्द, गावठाणात जगताप आळी आदी लोकवस्त्यांना अधिक जाणवेल.
याबाबत नीरा येथील विद्युत वितरण कंपनीच्या अभियंता श्रीमती दराडे यांनी सासवडच्या पाणी पुरवठ्याची गरज लक्षात घेऊन वीजेचे पडलेले दोन खांब तातडीने उभारून समस्याही गुरुवारी दूर केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com