
पुरंदरनजीक बेकायदेशीर दारू वाहतुकीवर कारवाई १.६९ लाखांचा ऐवज जप्त ; दोघे फरार व गुन्हे मात्र दाखल
सासवड, ता. २ ः सासवड ते गराडेनजिक मरिआई घाटमार्गापर्यंत पाठलाग करीत शिवापूरनजीक पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने व सासवड पोलिसांनी मोटार पकडली. त्यातील रुपये ८४ हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू आणि सुमारे ८४ हजार रुपये किमतीची मोटार, असा सुमारे एक लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
सोरतापवाडी (ता. हवेली) येथून वारजे (पुणे) येथे ही बेकायदेशीर तयार दारू घेऊन जात असताना मोटार पोलिसांनी पकडले. यातील आरोपी अजय तथा चालक विश्वास आवटे आणि मोटार मालक जॉनी ऊर्फ विजय रजपूत (दोघेही रा. रामनगर, लक्ष्मी चौक, वारजे माळवाडी, पुणे) यांच्याविरुद्ध पोलिस नाईक सोमेश भगवंतराव राऊत यांनी फिर्यादीद्वारे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच दारू, कॅन व मोटार हा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सासवड येथील उपविभागीय कार्यालयाचे पोलिस उपअधीक्षक तानाजी बरडे यांना माहिती मिळाली. सोरतापवाडी ते वारजेदरम्यान मोटारीमधून बेकायदेशीर हा भट्टीची दारू वाहतूक करणार आहे. आजही पहाटे ही मोटार जाणार आहे. त्यावरून पोलिस नाईक सोमेश राऊत व सहकारी यांनी सासवड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अण्णासाहेब घोलप व सहकाऱ्यांना मदतीला घेऊन सासवड ते गराडे मार्गावर पहाटे साडेचार वाजल्यापासूनच शोधार्थ वाहनातून लक्ष ठेवून होते. पहाटे पावणेसहा वाजता संबंधित क्रमांकाची गाडी सासवडला पुरंदर हायस्कूलसमोरील रस्त्याने सोरतापकडून वारज्याकडे जाताना दिसली. पोलिसांनी वाहनास थांबण्याचा इशारा करून त्यांनी गाडी पळवीत नेली. मग पोलिसांनी तब्बल १८ ते २० किलोमीटर अंतराचा पाठलाग करून मरिआई घाटमार्गाच्या पुढे व शिवापूरच्या अलीकडे पोलिसांनी त्यांना थांबले. मात्र, चालक अजय आवटे व विजय रजपूत पळून गेले. पोलिसांनी सासवड पोलिस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल करीत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. मोटारीमध्ये ३५ लिटरचे दारूने भरलेले १२ कॅन होते. या १२ कॅनसह एकूण ४२० लिटर्स गावठी हातभट्टीची दारू, मोटार, असा एकूण सुमारे एक लाख ६९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी या छाप्यात जप्त केला.