देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याने प्रगती

देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजल्याने प्रगती

तळेगाव ढमढेरे, ता. २९ : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळेच आपल्या देशात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजून प्रगती झाली असल्याचे मत पुण्यातील प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व माजी प्राचार्य राजेंद्र कांकरिया यांनी व्यक्त केले.
तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे शिक्षण प्रसारक मंडळ व शकुंतला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित साहेबराव शंकरराव ढमढेरे स्मृती व्याख्यानमालेच्या समारोपप्रसंगी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि युवक’ या विषयावर कांकरिया बोलत होते.
विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, वाघोलीचे मुख्याध्यापक संतोष भंडारी, व्याख्यानमालेचे समन्वयक प्रा. पद्माकर गोरे, प्रा. संदीप सांगळे, प्रा. रत्नप्रभा देशमुख, प्राध्यापक व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
कांकरिया म्हणाले, ‘‘आगामी काळात युवकांना विदीर्ण अशा प्रसंगांना सामोरे जावे लागणार आहे. आज जग जवळ आले आहे. भविष्यातील विविध आव्हानांचा यशस्वीपणे सामना करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनच आपल्याला तारणार आहे. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांनीदेखील सातत्याने विज्ञानाचा पुरस्कार केला. अंधश्रद्धेला खतपाणी घातले नाही. नव्या पिढीने देखील हा आदर्श जोपासणे गरजेचे आहे. निरीक्षण, तर्क आणि निष्कर्ष ही विज्ञानाची त्रिसूत्री आहे. वस्तुनिष्ठता ही विज्ञानाची मूलभूत संकल्पना आहे. अंधश्रद्धा हा समस्त मानवजातीला लागलेला शाप आहे. यामुळे सामाजिक अधोगतीकडे आपण जात आहोत. आजच्या गतिमान युगात प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगण्याचा विचार करावा.’’
संचालक महेशबापू ढमढेरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रा. दत्तात्रेय वाबळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मीनाक्षी पोकळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रवींद्र भगत यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com