उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

उरुळी कांचन परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट

उरुळी कांचन, ता. २८ : उरुळी कांचन (ता. हवेली) परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात हातभट्टी, दारू, जुगार अशा अवैध धंद्याचा सुळसुळाट सुरू झाला आहे. यासंदर्भात पोलिसांमध्ये वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातील महिलांनी केला आहे.

उरुळी कांचन हे हवेली तालुक्यातील एक महत्त्वाचे गाव म्हणून ओळखले जाते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या गावाची राजकीय, सामाजिक क्षेत्रात एक प्रगतशील व झपाट्याने विकास होणारे गाव अशी ओळख निर्माण झाली आहे. पुणे शहरात ये-जा करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गासह रेल्वे सेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने या गावाचे नागरिकरण झपाट्याने वाढत आहे.

मात्र, नागरिकांना सोबतच गावाच्या हद्दीतील विविध भागांत व वाड्यावर मोठ्या प्रमाणात अवैध धंदेही बोकाळले आहेत. या अवैध धंद्यामुळे किरकोळ भांडणांसह हाणामाऱ्या व गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत आहेत. याशिवाय हातावरचे पोट असणाऱ्या मजुरांच्या घरांमध्येही दारू आणि जुगारामुळे मोठ्या प्रमाणात वाद होतात. या अवैध धंद्यासंदर्भात अनेक महिलांनी अवैध धंदे चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र त्याचा काहीच फायदा होताना दिसत नाही. तक्रार करणाऱ्यांना अवैध धंदे चालकांकडून धमकावले जात आहे,तर पोलिस या सर्व घटनांकडे व अवैध धंद्यांकडे डोळेझाक करत असल्याच्या तक्रारी अनेक महिलांनी ‘सकाळ’च्या वार्ताहराकडे केल्या आहेत. अनेक महिलांनी पोलिसांत तक्रारी देण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिस तक्रार नोंदवून घेतच नाहीत, असे आरोप काही महिलांनी नाव उघड न करण्याच्या अटीवर केले आहेत.
---------------------
या परिसरात चालतात अवैध धंदे
इंदिरानगर, बायफ रस्ता, गोळे वस्ती, बडेकरनगर, महादेवनगर, जय मल्हार रस्ता, गारूड वस्ती, बाजार मैदान, लोखंडेनगर तसेच पुणे सोलापूर महामार्गावर विविध ठिकाणी दारू, मटक्याचे धंदे राजरोसपणे सुरू आहेत.
--------------------------------

अवैध धंदे सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. अवैध धंदे सुरू असल्याचे बीट मार्शलच्या निदर्शनास आल्यास आम्ही स्वत:हून कारवाई करतो. तक्रार आल्यानंतर कधीही दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केली जात नाही.
- किरण धायगुडे, पोलिस उपनिरीक्षक, उरुळी कांचन, ता. हवेली
-----------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com