आमदार जिथे आम्ही तिथे

आमदार जिथे आम्ही तिथे

Published on

सुवर्णा कांचन : सकाळ वृत्तसेवा
उरुळी कांचन, ता. ६ : अजित पवार यांच्या बंडाचे पडसाद पूर्व हवेलीतील गाव पातळीवर उमटले आहेत. येथील कार्यकर्त्यांना अजित पवार आणि शरद पवार हे दोन्ही नेते महत्त्वाचे आहेत. परंतु, गाव पातळीवरील काम करण्यासाठी आमदार हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. तसेच गावातील समस्या सोडविण्यासाठी आमदार हा कार्यकर्त्यांचा मुख्य केंद्रबिंदू आहे. त्यामुळे ‘आमदार जिथे आम्ही तिथे’ अशी स्पष्ट भूमिका येथील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी आपली भूमिका जाहीरपणे मांडली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये संमभ्रमवस्था निर्माण झाली आहे. सध्या येथील कार्यकर्ते ‘वेट ॲण्ड वॉच’च्या भूमिकेत आहेत. राष्ट्रवादी वेगळी व्हावी, असे कुठल्याही कार्यकर्त्याला आवडले नाही. परंतु, विकासाच्या दृष्टीने आमदार अशोक पवार जे निर्णय घेतील, ते कार्यकर्ते मान्य करतील, अशी अपेक्षा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
तर, पूर्व हवेलीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे. त्यामुळे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मोठी कोंडी झाली आहे. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र आल्याने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविण्यासाठी कोणाला तिकीट द्यायचे आणि कुणाच्या विरोधात प्रचार करायचा, अशी कार्यकर्त्यांची मोठी कुचंबणा होणार आहे.

काही सरपंच आधीपासूनच नाराज
नुकत्याच झालेल्या हवेली बाजार समिती निवडणुकीत भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाला मोठे यश मिळाले होते. या चुरशीच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून जोर लावण्यात आला होता. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. बाजार समिती निवडणुकीसाठी इच्छुक सरपंचांनी राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची अपेक्षा ठेवली होती, मात्र त्यांना पक्षश्रेष्ठीकडूनच नाकारण्यात आल्याने इच्छुकानी नाराजी व्यक्त केली होती. परिणामी आधीच नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांना या निर्णयाचा फारसा फरक पडलेला दिसत नाही.

अजित पवार गेल्याने काही फरक पडत नाही. भाजप प्रादेशिक पक्ष संपवण्यासाठीच अशी फोडाफोडी करत आहे. ते नेते फोडू शकतात, मतदारांना फोडू शकत नाही. भाजपने महाराष्ट्रात जो राजकीय दहशतीचा नंगा नाच लावला आहे, त्याला मतदार राजा येत्या निवडणुकीत असे काही उत्तर देईल की त्याची इतिहास नोंद घेईल.
- स्वप्नील कुंजीर पाटील, शिवसेना (ठाकरे गट) संघटक, शिरूर- हवेली विधानसभा

अजितदादा पवार हे भाजप आणि शिवसेनेत (शिंदे गट) आल्याचा आनंदच आहे. यामुळे पक्षाची ताकद वाढेल. त्यांच्या रूपात एक कणखर नेतृत्व आम्हाला लाभले आहे. ते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू. पक्षबांधणी करू.
- नीलेश काळभोर, जिल्हा संघटक, शिवसेना (शिंदे गट)

दादांचा या निर्णय अनपेक्षित आहे. तेथील राजकीय घडामोडीमुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला असाल, तरी राष्ट्रवादी ही वेगळी व्हावी, असे कुठल्याही कार्यकर्त्याला आवडले नाही. विकासाच्या दृष्टीने तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार अशोक पवार जे निर्णय घेतील, ते कार्यकर्ते मान्य करतील, अशी अपेक्षा आहे. राष्ट्र्वादी संघटना फार मजबूत आहे. शरद पवारसाहेब आणि अजितदादा पवार हे दोन्ही नेते प्रिय असल्याने कार्यकर्त्यांमध्ये सध्या संमभ्रमवस्था आहे.
- दिलीप वाल्हेकर, अध्यक्ष, हवेली तालुका, राष्ट्रवादी काँग्रेस

अनेक वेळा पक्षीय भूमिका बदलणाऱ्या आणि भ्रष्टाचाराचे बेसुमार आरोप असणाऱ्या पवार कुटुंबीयांच्या राष्ट्रवादी पक्षाला सत्तेत सामील करणे, हे भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी धक्कादायक होते. शिवसेना कार्यकर्त्यांची सन २०१९च्या मुख्यमंत्री निवडीनंतर ज्याप्रमाणे गळचेपी झाली, तशी भाजप कार्यकर्त्यांची होईल, हा संभ्रम सगळीकडे आहे. महायुती सरकार जर विकासाच्या अजेंडा पुढे नेणार असेल, तर पारदर्शक प्रतिमा असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आम्ही कायम असणार आहोत.

- सुदर्शन चौधरी, सरचिटणीस, भाजप, पुणे ग्रामिण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.