दुचाकीस्वाराला गुंगारा देऊन 
वरवंडला आठ लाखांची चोरी

दुचाकीस्वाराला गुंगारा देऊन वरवंडला आठ लाखांची चोरी

Published on

वरवंड (ता. दौंड) ः येथे दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी एका दुचाकीस्वाराकडील ८ लाख रुपये रक्कम असलेली पैशाची बॅग लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. शनिवारी (ता. ३०) दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्र बँकेसमोर ही घटना घडली.
याबाबत नंदकुमार गदादे (रा. केडगाव, ता. दौंड) यांनी यवत पोलिस ठाण्यात फिर्यादी दिली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने यांनी माहिती दिली. फिर्यादी गदादे हे त्यांच्या मालकाचे (एक ठेकेदार) ११ लाख रुपये बँकेत भरण्यासाठी घेऊन आले. मात्र, मालकाने अचानक तीन लाख रुपयेच बँकेत भरण्यास सांगितले. त्याप्रमाणे पैसे भरून उरलेले सात लाख ९० हजार रुपये घेऊन ते पुन्हा माघारी निघाले. पैसे असणारी बॅग हातात घेऊन ते बँकेबाहेर लावलेल्या दुचाकीकडे आले. त्यावेळेस दुचाकी पंक्चर होती. पैशाची बॅग हँडलला लावून दुचाकी ढकलत ते निघाले. त्यावेळी पाठीमागून डोक्यात हेल्मेट घालून दुचाकीवरून आलेल्या दोन इसमांनी गदादे यांच्या दुचाकीला असलेली पैशाची बॅग हिसकावली. गदादे यांना समजण्याअगोदर ती बॅग घेऊन त्यांनी पलायन केले. गदादे यांनी आरडाओरडा केला. मात्र, दुचाकीवरील अज्ञात चोरटे पसार झाले. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी गदादे यांच्या दुचाकीकडे धाव घेतली. वर्दळीच्या ठिकाणी चोरीचा प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, पोलिस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने, पोलिस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर हे पोलिस पथकासह घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिसराची बारकाईने पाहणी केली. यावेळी आजूबाजूच्या दुकानातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरीचा हा प्रकार दिसून आला. गदादे यांनी दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने यवत पोलिस ठाण्यात या अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या चोरीप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश माने करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com