
दूध भेसळ प्रकरणात आणखी एकाला अटक
वडगाव निंबाळकर, ता. २० : दूध भेसळ प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील समीर सुभाष मेहता यांच्या घरावर पोलिस आणि अन्नभेसळ प्रतिबंधक (एफडीए) खात्याच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त छापा टाकला. त्यामध्ये दूध भेसळीचे साहित्य आणि मशिन सील केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात दूध भेसळ प्रकरणात समीर मेहता हा दूध भेसळीचे द्रावण विकणारा प्रमुख वितरक असल्याची माहिती तपासात पुढे आल्यामुळे वडगाव निंबाळकर येथील राहत्या घरावर छापा मारला. यावेळी तांत्रिक माहितीच्या आधारे मेहता याला विक्रीसाठी मदत करणारा साथीदार स्वप्नील राजेंद्र गायकवाड (रा. वडगाव निंबाळकर) याला पंढरपूर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयाने २३ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मेहता याच्याकडून आणखी कुठे-कुठे हे घातक द्रावण भेसळीसाठी पुरवले जात होते, याची चौकशी गायकवाड याच्याकडे पोलिस करत आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून मेहता फरारी झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.