तोरणागडावरील बिन्नी दरवाजाचे काम पूर्ण

तोरणागडावरील बिन्नी दरवाजाचे काम पूर्ण

वेल्हे, ता.१३ : तोरणागडाच्या बिन्नी दरवाजाचे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या डागडुजीचे काम अखेर पूर्ण झाले आहे. त्यामुळे शनिवारपासून (ता.१३) वेल्हे मार्गाने गड पर्यटकांना खुला केल्याची माहिती पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वाहणे यांनी दिली.
बिन्नी दरवाजाचे काम रेंगाळल्याने चार महिन्यांपासून गड वेल्हे मार्गाने पर्यटनाला बंदच होता. यासाठी पर्यटकांना वाजेघरमार्गे मेट पिलावरे या मार्गाने किल्ले तोरणा गडावर प्रवेश करता येत होता. परंतु हा मार्ग अनेकांना माहिती नसल्याने ऐन सुट्टीच्या काळात पर्यटकांना वेल्हे येथून माघारी जावे लागत होते.
गडावर जाण्यासाठी वेल्हेमार्गे बिन्नी दरवाजा हा प्रमुख मार्ग आहे. गडावरील विविध डागडुजीच्या कामाला डिसेंबर महिन्यात सुरुवात करण्यात आली होती. उंच कड्यावरील खडकातील मुख्य प्रवेशद्वाराच्या डागडुजीमुळे गडावर ये-जा करणारा मुख्य मार्ग पर्यटकांना बंद केला होता. दरम्यान, चार महिन्यांपासून गड बंद असल्याने वेल्हे, तोरणा परिसरातील खाद्यपदार्थ विक्री, हॉटेल व्यवसायावर परिणाम झाला होता. हा मार्ग मोकळा झाल्याने येथील व्यावसायिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वाहणे म्हणाले, की शुक्रवारपर्यंत (ता.१२) बिन्नी दरवाजाचे मुख्य काम पूर्ण झाले. त्यामुळे कामासाठी दरवाजात रचण्यात आलेली पोती काढली असून बिन्नी दरवाजाचा मार्ग पर्यटकांना खुला केला आहे.
निमुळत्या, उंच कड्यावर अत्यंत बिकट ठिकाणी बिन्नी दरवाजा आहे. जवळपास वीस फूट उंची आहे. शिवकालीन बांधकाम उन्मळून लागले होते. दगड, तट पडले होते. त्यामुळे दरवाजा जमीनदोस्त होऊन मुख्य मार्ग बंद होण्याचा शक्यता असल्याने पुरातत्त्व खात्याने दरवाजाच्या डागडुजीचे काम सुरू करण्यात आले होते.
बिन्नी दरवाजा व गडावरील इतर डागडुजीच्या कामांसाठी शासनाने साडे चार कोटी रुपयांचा निधी दिला आहे. बिन्नी दरवाजा मार्ग मोकळा करण्यात आला तरी दरवाजाच्या भिंती, बुरुजाचे तसेच म्हसोबा टाके, तोरणाजाई टाके, श्री मेंगाई मंदिर दुरुस्ती, रेलिंग आदी कामे मे अखेरपर्यंत सुरू राहणार आहेत. त्यासाठी अभियंता संदीप सुतार यांच्या देखरेखीखाली काम सुरू आहे.
दरम्यान, पुरातत्त्व विभागाचे पाहरेकरी दादू वेगरे, तसेच राजू बोराणे, हे सुद्धा गडावरील कामांबाबत दक्षता घेत आहेत.

01778

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com