इंदापूर तालुक्यातील शेतकरी धास्तावले

इंदापूर तालुक्यातील शेतकरी धास्तावले

वालचंदनगर, ता. १७ : केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी पंढरपूर येथील एका कार्यक्रमामध्ये नीरा डाव्या व उजव्या कालव्याच्या पाण्यावर वक्तव्य केले असून, कालव्याचे पाणी बारामतीला पळविल्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघावरती अन्याय झाला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कालव्याचे पाणी कमी होण्याच्या भीतीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी धास्तावला असून, कालव्याच्या पाण्याचा प्रश्‍न पेटणार आहे.
नीरा खोऱ्यातील भाटघर, वीर आणि नीरा देवघर या धरणातील पाणीसाठ्यातून नीरा डावा व नीरा उजवा कालव्याला पाणीवाटप केले जाते. सन २००७ मध्ये नीरा देवघर धरणाची निर्मिती झाली असून, कालव्याची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे धरणातील उपलब्ध पाणी नीरा उजवा कालव्यास सुमारे ४५ टक्के तर नीरा डाव्या कालव्यास सुमारे ५५ टक्के प्रमाणात पाणी देण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला होता. सन २०१७ पर्यंत पाणीही मिळत होते. दहा वर्षानंतर पाणी वाटपाचा करार संपल्यानंतर सन २०१८ तत्कालीन भाजप सरकार काळामध्ये भाजपचे माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या मागणीवरून नीरा-देवघरच्या पाण्याचा निर्णय बदलण्यात आला. त्यामुळे नीरा डाव्या कालव्याचे पाणी कमी झाले. याचा सर्वाधिक फटका इंदापूर तालुक्याला बसणार आहे. मात्र, सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी भाजप सरकारच्या काळातील निर्णय बदलून पूर्वीसारखेच पाणी वाटप ठेवले. त्यामुळे इंदापूर व बारामती तालुक्याला मिळणारे पाणी पूर्वीसारखे मिळू लागले.
गेल्या अनेक वर्षापासून पाणीवाटपाच्या मुद्द्यावरून डावा व उजवा या कालव्यावरील पाण्याचा संघर्ष कायम धुमसत राहिला आहे. सत्ताबदलानंतर पुन्हा खासदार निंबाळकर यांनी कालव्याच्या
पाण्याकडे पुन्हा लक्ष केंद्रित केले असून, थेट केंद्र सरकारच्या पातळीवर हा विषय नेला आहे. त्यासाठी केंद्रीय जलशक्तीमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी या प्रश्‍नाची हवाई पाहणी केल्याची चर्चा सुरु आहे. नीरा-देवघरच्या पाण्याचे फेरवाटप झाल्यास सर्वाधिक तोटा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा होणार आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकरी धास्तावले आहेत. या निर्णयाचे संकट अधिक गडद होण्याची भीती असून, सर्वाधिक परिणाम इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यावरती होईल.

इंदापूरचा पाणी प्रश्‍न पेटणार
इंदापूर तालुक्याच्या एका बाजूला भीमा आणि दुसऱ्या बाजूला नीरा नदी वाहते. तसेच, उजनी जलाशयाचा अथांग जलसागर ही तालुक्याला लाभलेला आहे. नीरा डावा व खडकवासल्याच्या कालव्यातून तालुक्याला पाणी येते. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून इंदापूर तालुक्यातील २२ गावांतील शेतकऱ्यांसह तालुक्यातील इतर गावे ही पाण्यापासून वंचित असून, आंदोलने करीत आहे. तिसरी पिढीही आंदोलनाच्या तयारीत आहे. माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी उजनीतून ५ टीएमसी पाण्याची तरतूद केली होती. मात्र, उजनीच्या पाण्यावरून इंदापूर तालुक्यासह सोलापूरचे वातावरण तापल्यामुळे ५ टीएमसी पाण्याच्या निर्णय रद्द करावा लागला. येणाऱ्या काळामध्ये इंदापूरचा पाण्याचा प्रश्‍न पुन्हा निश्‍चित पेटणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com