बिगारी कामगार ते जरबेरा फुलांचा व्यापारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिगारी कामगार ते जरबेरा फुलांचा व्यापारी
बिगारी कामगार ते जरबेरा फुलांचा व्यापारी

बिगारी कामगार ते जरबेरा फुलांचा व्यापारी

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः पायात चप्पल नाही, अंगावर फाटलेले कपडे, घरात एक वेळच्या जेवणाची भ्रांत, घरची परिस्थिती बेताची, सुटीच्या दिवशी बिगारी काम करून घराला आर्थिक आधार देण्याचा सुरू असलेला छोटासा प्रयत्न; तर दुसरीकडे शाळेचा अभ्यास, असं सुरू असताना एक दिवस अचानक वडिलांचा अपघात होतो. अनेक प्रयत्न करूनही वडिलांचे प्राण वाचवता न आल्याची खल मनावर परिणाम करू गेली. कधी तरी चांगले दिवस येतील, ही आशा सत्यात उतरवण्यासाठी त्याच्या वडिलांच्या जळत्या चितेच्या आगीने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. त्यामुळेच तो बिगारी ते एक यशस्वी फुलांचा व्यापारी होऊ शकला.

ही कहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेलाही लाजवेल अशी असली, तरी ती सत्य असून, एका दिवसात उभी राहिलेली नसून त्याला अथक परिश्रमांची जोड असल्याने वकील होण्याचे स्वप्न असूनही परिस्थितीने व्यापारी बनवले, असे पुण्यातील तरुण सुनील गोयकर सांगतो.
वडील हमाली काम करीत होते, त्यांचा अपघाती मृत्यू झाला. एकच आधार होता, तोही काळाने हिरावून नेला. आईने घरची जबाबदारी सांभाळली, असे सुनील सांगतो.

वडिलांच्या उपचारासाठी पैसे उसनवारीने घेतले होते. ते फेडण्यासाठी काम करणे हाच उपाय होता. एका कंपनीमध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करू लागलो. त्यात खर्च भागविणे कठीण होऊ लागल्याने एका मित्राच्या सल्ल्याने रस्त्यावर थांबून फुले विकू लागलो. प्रामाणिकपणे काम करणे आणि आयुष्यात कधीच व्यसन न करणे या वडिलांच्या सूत्रानुसार काम करत आहे. त्यामुळे अनेक अडथळे येऊनही पुढे जाता येणे शक्य होते. एक दिवस मार्केट यार्डमध्ये फुले विकत घेताना मार्केटमध्येही फुले विकण्यासाठी जागा मिळू शकते, याची माहिती मिळाली, त्यानुसार मार्केटमध्ये फुले विकू लागलो. मार्केटमध्ये झेंडूच्या फुलांचे विक्रेते आणि व्यापारी मोठ्या संख्येने आहेत, अशी माहिती अभ्यास केल्यामुळे मिळाली. जर या व्यवसायात टिकायचे असेल, तर ज्याला मागणी अधिक आहे आणि विक्रेते कमी आहेत, अशा फुलांचा व्यवसाय करावा असा विचार केला. तेव्हापासून ज्या फुलाचे नाव माहिती नव्हते. त्या जरबेरा फुलांची विक्री सुरू केली. शेतकऱ्यांशी असलेले चांगले संबंध आणि त्‍यांनी ठेवलेला विश्‍वासामुळे देशभरात फुलांचा व्यापार करता येत आहे, असे सुनील सांगतो.

‘‘रिकामा हंडा राहण्यापेक्षा भरलेला हंडा बना, असे शिक्षक सांगत असत. त्यावाटेवर जीवनाचा प्रवास सुरू आहे. विठ्ठल चंद्रभान गोयकर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा करत आहे. वडिलांचे शरीर सोडून गेले आहे, मात्र त्यांचे संस्कार जिवंत आहेत. कितीही दुःख, गरीबी असली आणि त्यात अपयश आले, तरी इच्छा शक्तीमुळे यशस्वी होता येते.’’
- सुनील गोयकर

PNE22S32731, PNE22S32762

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top