सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन

सावित्रीबाई फुले यांना जयंतीदिनी अभिवादन

‘सावित्रीबाई यांच्या विचारांची समाजाला गरज’
पुणे, ता. ३ : ‘‘प्रबोधन आणि शिक्षणाबरोबर समाजात महिलांसाठी प्रगतीची वेगवेगळी द्वारे खुली करण्याचे काम महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले. प्रत्येक दिवशी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आज समाजाला गरज आहे.’’ अशा शब्दात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुढील काही काळाने विविध निवडणूका आहे त्यामध्ये महिला मतदारांनी जागृतीने मतदान करावे. त्याच सोबत समाजात असलेल्या विविध प्रश्‍नांवर एकोपा समाजातील तेढ दूर व्हावे अशी भावना ठेवते. शिक्षण शुल्क नियंत्रण समितिचे शिरीष फडतरे, ज्येष्ठ सल्लागार शेलार गुरुजी, अनिता शिंदे, मंगला पाटील, अनिता परदेशी, आश्लेषा खंडागळे, अनिता गावकरी, युवराज सिंगाडे उपस्थित होते.


भारतरत्न द्यावा
‘‘सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांचे महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतमजूर आणि कष्टकऱ्यांसाठी सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक कार्य पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक आणि दीपस्तंभासारखे आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना भारतरत्न किताब देऊन सन्मानित करावे,’’ अशी मागणी राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांनी केली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सप्ताहाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद आणि महिला विकास मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ कवयित्री संमेलनाच्या उद्‍घाटनावेळी रोकडे बोलत होते. प्रेरणा कांबळे या विद्यार्थिनीने सावित्रीबाईंच्या पेहरावात ‘मी सावित्री’ हा एकपात्री प्रयोग सादर केला. औंध येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात झालेल्या कविसंमेलनात २३ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष संतोष बारणे, कार्याध्यक्ष प्रकाश जवळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, कवी संमेलनाच्या अध्यक्षा कवयित्री मधुश्री ओव्हाळ, साहित्यिक प्रा. चंद्रकांत वानखेडे, गझलकार संतोष घुले, ज्ञानेश्वर कांबळे, संतोष पाचुंदकर, प्रा. बी. एस. पाटील आदी उपस्थित होते. डॉ. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आसावरी शेवाळे यांनी आभार मानले.


‘भिडेवाड्यात स्मारकाचे काम मार्गी लावा’
भिडेवाड्याचा जीर्णोद्धार करून तिथे राष्ट्रीय स्मारक करावे, या मागणीचे ७५ कार्यकर्त्यांच्या सहीचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांना दिले. यावेळी महाराष्ट्र अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील, राज्यपदाधिकारी विशाल विमल, शिवाजीनगर शाखेच्या अध्यक्षा वनिता फाळके, ज्येष्ठ कार्यकर्ते सदाशिव फाळके, नम्रता ओव्हाळ, स्वप्नील भोसले, अरिहंत अनामिका उपस्थित होते. निवासी उपजिल्हा अधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पोचवले जाणार आहे.

‘भिडेवाड्याची जमीन भूसंपादित करा’
महात्मा जोतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली व ज्ञानाची गंगा दारोदारी पोचवली. ज्या फुले दांपत्यांनी अनेक अडचणींचा सामना करत मुलींसाठी भिडेवाड्यामधून शिक्षणाची दारे खुली करून दिली, अशा ऐतिहासिक भिडेवाड्याची अवस्था खूपच दयनीय झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने भिडेवाड्याची जमीन भूसंपादित करून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. यावेळी नीता होले फुले (वंशज), संघटनेच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख क्षिप्रा मानकर, प्रदेश कार्याध्यक्ष नंदा शिंदे, पुणे जिल्हाध्यक्ष सुनीता शिंदे, राजश्री शितोळे आदी उपस्थित होत्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com