‘सेल्फ टेस्टिंग’ची मागणी वाढली बाधितांच्या संपर्कातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘सेल्फ टेस्टिंग’ची मागणी वाढली
बाधितांच्या संपर्कातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी
पुण्यात ‘सेल्फ अँटिजेन कोविड किट’ची मागणी वेगाने वाढली

‘सेल्फ टेस्टिंग’ची मागणी वाढली बाधितांच्या संपर्कातील लोकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी

sakal_logo
By

पुणे - कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या वाढू लागल्याने माय लॅबने (Mylab) विकसित केलेल्या ‘सेल्फ अँटिजेन कोविड किट’ची (Self Antigen Covid Kit) मागणी (Demand) वेगाने वाढली आहे. कोरोना लक्षणे असलेल्या आणि कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांकडून याची मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू असल्याची माहिती औषध विक्रेत्यांकडून मिळाली.

‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे ड्रगिस्ट’चे सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘हे किट वापरण्यास सोपे आहे. तसेच त्याचा निष्कर्ष विश्वासार्ह असल्याने याला नागरिकांनी पसंती दिली आहे. यातून कोरोना झाल्याचे निदान झाल्यास त्यावर उपचारासाठी डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. तसेच, औषधोपचारादरम्यान डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे गृह विलगीकरणात राहाणे आवश्यक आहे.’’

हेही वाचा: सावकाराने व्याजाच्या ८५ हजारांपोटी केली ५९ लाख रुपयांची मागणी

‘मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन’चे व्यवस्थापकीय संचालक हसमुख रावळ म्हणाले, ‘कोरोना विषाणूमध्ये बदल होऊन ओमिक्रॉन हा नवीन व्हेरिएंट आला आहे. त्याचे अचूक निदान या किटमधून करता येते. सध्या कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करण्याची भीती काही रुग्णांना वाटते. अशा रुग्णांसाठी हा उत्तम सुरक्षित पर्याय आहे. या किटची विश्वासार्हता असल्याने ही चाचणी केल्यानंतर कोणतीही चाचणी नव्याने करण्याची गरज राहात नाही. मात्र, रुग्णाला कोरोनाची स्पष्ट लक्षणे असतील आणि चाचणी ‘निगेटिव्ह’ असेल तर खबरदारीचा उपाय म्हणून पडताळणी चाचणी करावी. या किटचा ‘रिपोर्ट’ हा ‘भारतीय वैद्यक संशोधन परिषद’ला (आयसीएमआर) नोंदविण्याची सुविधादेखील आहे. त्यामुळे जिथे मोबाईल फोन आहे, तेथे या आधारावर निदान आणि नोंदणी करता येते.’ नागरिकांना घरच्या घरी चाचणी करता येत असल्याने विषाणूचा संसर्ग रोखण्यात हे किट उपयुक्त ठरत आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या महाराष्ट्र शाखेचे सचिव डॉ. मंगेश पाटे म्हणाले, ‘कोरोना निदानासाठी नागरिकांकडून ‘कोविड सेल्फ टेस्ट किट’ वापरण्यात येत आहे. त्यासाठी कोणत्याही डॉक्टरांच्या चिठ्ठीची गरज नाही. औषधाच्या दुकानातून हे किट विकत घेऊन नागरिक घरातच याची चाचणी करू शकतात. त्याची सरकारी नोंद आवश्यक आहे. ती नागरिकांनी केली पाहिजे. तसेच, हे किट डॉक्टरांकडे उपलब्ध केल्यास एकाच ठिकाणी निदान आणि उपचार मिळू शकतील.’’

माझ्या वडिलांचे वय ७० वर्षे आहे. त्यांना हृदयविकार असून, दोन दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला आहे. डॉक्टरांनी कोरोना चाचणीचा सल्ला दिला. पण, रुग्णालयात गर्दीत घेऊन जाण्याची भीती वाटते. त्यामुळे सेल्फ अँटिजेन कोविड टेस्टचा पर्याय चांगला वाटला.

- समीर शेळके, ग्राहक

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Coronaviruspune
loading image
go to top