पालिकेत समाविष्ट गावांमधील ५८६ झेडपी शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांतील रिक्त जागी नियुक्त्या ः विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पालिकेत समाविष्ट गावांमधील 
५८६ झेडपी शिक्षकांचे समायोजन 

जिल्हा परिषद शाळांतील रिक्त जागी नियुक्त्या ः विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान
पालिकेत समाविष्ट गावांमधील ५८६ झेडपी शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांतील रिक्त जागी नियुक्त्या ः विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

पालिकेत समाविष्ट गावांमधील ५८६ झेडपी शिक्षकांचे समायोजन जिल्हा परिषद शाळांतील रिक्त जागी नियुक्त्या ः विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३८ गावांमधील ५८६ शिक्षकांचे समायोजन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने घेतला आहे. या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त जागांवर सेवाज्येष्ठतेनुसार समायोजनाने नियुक्ती दिली जाणार आहे. नवीन नियुक्तीची ही प्रक्रिया येत्या शनिवारपर्यंत (ता. १५) पूर्ण केली जाणार आहे. मात्र सध्या सुरू असलेले शैक्षणिक वर्ष मध्यावर आले आहे. अशा स्थितीत या शिक्षकांचे केले जाणारे समायोजन हे विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे तुर्तास हे समायोजन केले जाऊ नये, अशी मागणी करत याला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने तीव्र विरोध दर्शविला आहे.

महापालिका प्रशासनाने अद्याप या शाळांवर पालिकेच्या शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या नसल्याने, शैक्षणिक वर्षाच्या मध्यावर या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या सर्व गावांमधून मिळून सुमारे ३० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्हा परिषद क्षेत्रातील गावांचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर केवळ शाळांच्या इमारती पालिकेकडे वर्ग होत असतात. मात्र या शाळांवर कार्यरत असलेले केंद्रप्रमुख, पदवीधर शिक्षक आणि उपशिक्षक हे जिल्हा परिषदेच्या सेवेत कायम राहत असतात. त्यामुळे या समाविष्ट गावांमधील शाळांवर नवीन शिक्षकांची नियुक्ती करण्याची जबाबदारी पालिकेची असते. जिल्हा परिषद प्रशासन हे नियमानुसारच या शिक्षकांना समायोजनेद्वारे झेडपीच्या अन्य शाळांमधील रिक्त जागांवर नियुक्ती देत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या या शिक्षक समायोजन प्रक्रियेला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला आहे. ३८ समाविष्ट गावांतील शाळांमध्ये शिक्षक नियुक्त करण्याबाबत पुणे महापालिकेने अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही. शिवाय या जागांवर राज्य सरकारच्या पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया राबविण्यासाठी आणखी किमान एका वर्षाचा कालावधी लागणार आहे. त्यात जाहिरात देण्यापासून ते शिक्षक नेमणुकीपर्यंत सर्व बाबी पूर्ण कराव्या लागतील. यापूर्वी समाविष्ट गावे पुणे महापालिका हद्दीत आल्यावर तेथील शाळांत काम करणारे शिक्षक शाळांसह पुणे महापालिकेत समाविष्ट होत असत. मात्र २०१९ मध्ये ग्रामविकास विभागाने काढलेल्या आदेशात प्रशासनाने परस्पर बदल करून समाविष्ट गावांतील शिक्षकांना पुणे पालिकेत येण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे या संघाचे अध्यक्ष माधवराव पाटील यांनी सांगितले. पुणे जिल्हा परिषदेने गेल्या २५ वर्षांपासून शिक्षकांना निवड श्रेणी दिलेली नाही. मग शिक्षक समायोजनाबाबतचाच निर्णय अचानक का घेतला असा सवाल संघटनेने केला आहे.

समायोजनाबाबतची संक्षिप्त माहिती
पालिकेत समाविष्ट गावे ३८
समाविष्ट गावांतील झेडपी शाळांची संख्या ७४
या शाळांमधील विद्यार्थी संख्या सुमारे ३० हजार
केंद्रप्रमुख ०३
मुख्याध्यापक १८
पदवीधर शिक्षक १०४

उपशिक्षक ४६१
एकूण शिक्षक ५८६


पुणे महापालिकेत समाविष्ट गावांमधील जिल्हा परिषद शाळांचे हस्तांतर झालेले आहे. त्यामुळे या शाळांवर महापालिकेने शिक्षकांची नियुक्ती करणे अपेक्षित आहे. फक्त महापालिकेत समाविष्ट झालेल्या झेडपी शाळांमधील शिक्षकांचे समायोजन केले जात आहे. झेडपी प्रशासनाच्या दृष्टीने हे सर्व अतिरिक्त शिक्षक आहेत.
आयुष प्रसाद,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top