पुणे शहरात ७५ टक्के लसवंत! एका वर्षात दोन्ही लससाठी ६५ लाख डोसचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे शहरात ७५ टक्के लसवंत!
एका वर्षात दोन्ही लससाठी ६५ लाख डोसचा वापर
पुणे शहरात ७५ टक्के लसवंत! एका वर्षात दोन्ही लससाठी ६५ लाख डोसचा वापर

पुणे शहरात ७५ टक्के लसवंत! एका वर्षात दोन्ही लससाठी ६५ लाख डोसचा वापर

sakal_logo
By

पुणे, ता. १५ : एका वर्षापूर्वी म्हणजेच गेल्या १६ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. शहरात कधी लशीचा तुटवडा, तर कधी केंद्रावरील गोंधळामुळे गेले वर्षभर कोरोना लसीकरण चर्चेत होते. मात्र, चुकांमधून शिकत जात आणि लसीकरणाची प्रक्रिया सुलभ होत गेल्या वर्षात शहरात ६५ लाखांपेक्षा जास्त डोस देण्यात आले. आतापर्यंत ७५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत.

मार्च २०१९ मध्ये कोरोनाची पहिली लाट आली, लॉकडाउन जाहीर झाला. रुग्णांची वाढत जाणारी संख्या आणि मृत्यूमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण होते. आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक यासर्व क्षेत्राला खीळ बसली. याच काळात रोखण्यासाठी लसीचे संशोधन सुरू झाले, चाचण्या सुरू झाल्या. त्यात अखेर यश आलेच केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशभरात १६ जानेवारीपासून आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण सुरू करण्यात आले. त्यानंतर फ्रन्टलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक, १८ वयाच्या पुढील नागरिकांना लसीकरणात सहभागी करून घेण्यात आले. सुरुवातीच्या टप्प्यात लसीबद्दल असलेले गैरसमज, अफवांमुळे लसीकरणासाठी प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, मार्च-एप्रिल मध्ये करण्याची दुसरी लाट सुरू झाली. त्यानंतर मात्र लसीकरणासाठी गर्दी वाढली.

महापालिकेतर्फे सुरुवातीला मोजकीच लसीकरण सुरू केली होती. नगरसेवकांनी आपल्या भागात लसीकरण केंद्र हवे, असा हट्ट सुरू केल्याने यावरून राजकारण सुरू झाले. अखेर एका नगरसेवकाला एक केंद्र याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली आणि प्रशासकीय सोयीसाठी काही लसीकरण केंद्र निश्चित केली. शहरात सुमारे दोनशेच्या आसपास लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली.

केंद्राची संख्या वाढल्याने लशीचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे लसीकरण केंद्रांवर गोंधळ होऊ लागला. यामुळे महापालिकेने ग्लोबल टेंडर काढून लस विकत घेण्याची घोषणा केली. पण केंद्र सरकारने परवानगी न दिल्याने हा प्रस्ताव बारगळला. जुलै महिन्यापासून मोठ्याप्रमाणात लस उपलब्ध होऊ लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. तसेच कोव्हिशील्ड लशीचा दुसरा डोस ८४ ते ११२ दिवसांमध्ये घ्यावा, असा आदेश काढल्याने केंद्रावरील गर्दी आपोआप कमी झाली.

शाळकरी मुलांना दिलासा
अठरा वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांचे लसीकरण सुरू असले, तरी त्याखालील वयोगटातील मुलांचे लसीकरण केले जात नव्हते. एकीकडे शाळा, महाविद्यालय सुरू झालेले असताना विद्यार्थ्यांचे लसीकरण नसल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अखेर ३ जानेवारीपासून केंद्र सरकारने १५ ते १८ वयोगटातील लसीकरणाची सुरू केले. त्यामुळे नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण सुरू
झाले आहे. शहरात साधारणपणे या वयोगटातील २ लाख ६० हजार मुलांना लस देण्याचे महापालिकेचे लक्ष असून आतापर्यंत पंचावन्न हजार जणांनी पहिला डोस घेतला आहे.

लसीकरणाचे नियोजन
- शहरात महापालिकेचे सुमारे २०० केंद्र
- लसीच्या उपलब्धतेनुसार एका केंद्राला प्रतिदिन १०० ते २५० डोस दिले
- एका प्रभागात चार लसीकरण केंद्र झाल्याने सोईचे केंद्र निवडणे सोपे
-लसीकरण केंद्रावरील राजकीय हस्तक्षेप थांबविण्यासाठी नगरसेवकांवर थेट कारवाईचा इशारा
-झोपडपट्टी भागात जनजागृती करून लसीकरण वाढविण्यासाठी ‘व्हॅक्सिनेशन ऑन व्हिल’चा यशस्वी प्रयोग
- सामाजिक संघटना, संस्था, कंपन्यांनी सीएसआरमधून मदत केली

महापालिकेतील अधिकारी, पदाधिकारी यांच्यासह शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे एका वर्षात शहरात ६५ लाखांपेक्षा जास्त डोसचे लसीकरण झाले. यात ७५ टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. पुढील काळात १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोस याचेही लसीकरण व्यवस्थित पार पाडण्यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी

कोरोनाची भीती होतीच, पण लसीकरण सुरू झाल्यावर आपल्याला लस कधी मिळणार याची उत्सुकता होती. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार टप्प्याटप्प्याने घरातील सर्वांचे दोन्ही डोस झाले आहेत. पुढील नियोजनही याच पद्धतीने व्हावे.
- मंदार कुलकर्णी, नागरिक

शहरात झालेले लसीकरण (१४ जानेवारीपर्यंत)
पहिला डोस : ३६,७१,८२३
दुसरा डोस : २८, १३, २४८
बूस्टर डोस : १८६५३
एकूण लसीकरण : ६५,०३,७८१

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top