फ्रान्सच्या पत्रकाराने साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय

फ्रान्सच्या पत्रकाराने साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे संग्रहालय

पुणे, ता. ३ : फ्रान्सचा एक पत्रकार पुण्यात येतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या कुतूहलापोटी येथील संग्रहालयाला भेट देतो. मात्र ज्या पुण्यात छत्रपतींचे बालपण गेले, तेथेच त्यांच्या संपूर्ण इतिहासाला उलगडणारे एकही संग्रहालय नसावे याची खंत त्याला वाटते. आणि म्हणूनच तो स्वतः महाराजांचा इतिहास उलगडणाऱ्या संग्रहालयाची निर्मिती करण्याचा ध्यास घेतो. अन् बघता-बघता भारताच्या इतिहासाचे समृद्ध संग्रहालय उभे राहते.

फ्रॉन्सवा गॉटियार यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतून त्यांनी ‘फाउंडेशन फॉर ॲडव्हान्समेंट ऑफ कल्चरल टाइज’ (फॅक्ट) या संस्थेची स्थापना केली. संस्थेच्या माध्यमातून गॉटियार व त्यांची पत्नी नम्रिता यांनी लोहगाव येथे वडगाव शिंदे रस्त्यावर ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय इतिहास’ असे चित्रांचे संग्रहालय साकारले आहे. यामध्ये छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई यांच्यासह औरंगजेबाची पत्रे, दारा शुकोहचे कार्य, अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट उलगडणाऱ्या चित्रांचा समावेश आहे. विशेष म्हणजे येथे वेदांपासून काश्‍मीर आणि बांगलादेशच्या घडामोडींवर भाष्य करणारी स्वतंत्र दालने आहेत. २०१० पासून गॉटियार यांनी स्थानिकांच्या मदतीने टप्प्याटप्प्याने हे चित्ररूपी संग्रहालय साकारले आहे. येथील व्यवस्थापक रावसाहेब काकडे म्हणाले, ‘‘भारतीय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकासाठी हे संग्रहालय खजिना आहे. येथे सर्वांना मोफत प्रवेश असून, अभ्यास सहलींसह शिबिरांनाही आम्ही प्रोत्साहन देतो. कोरोनानंतर पुन्हा एकदा देशभरातील जाणकारांची पावले संग्रहालयाकडे वळाली आहेत.’’ भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प हे या संग्रहालयाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

शिक्षणासाठी उपयुक्त
इतिहासाच्या आधारे येथे प्रत्येक प्रसंग चित्ररुपात साकारण्यात आला आहे. त्यामुळे अगदी सहज, सोप्या पद्धतीने इतिहास आणि महापुरुषांचे अतुलनीय योगदान उलगडते. स्वतंत्र दालनांबरोबरच अभ्यास आणि चिंतनासाठी येथे चांगले वातावरण आहे. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांपासून स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना इतिहासाशी निगडित माहिती या ठिकाणी उपलब्ध होते. येथे एक छोटेखानी ग्रंथालय आणि व्हिडिओ प्रदर्शनीदेखील साकारण्यात आली आहे.

‘‘भारतीय इतिहास जसा घडला तसा मांडण्याचा आमचा प्रयत्न आहे. जसा लिहिला गेला आहे तसा नव्हे. निश्‍चितच हे संवेदनशील आणि आव्हानात्मक काम आहे. सर्वसामान्यांपर्यंत भारताचा समृद्ध इतिहास पोचावा म्हणून सर्व सुविधा निःशुल्क उपलब्ध केल्या आहेत. आज उभे राहिलेले हे संग्रहालय भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्हावे, यासाठी अनेक बदल अपेक्षित आहेत. त्यासाठी समाजातील जाणकारांच्या पाठिंब्याची गरज आहे.
- फ्रॉन्सवा गॉटियार, संस्थापक-विश्‍वस्त, फॅक्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com