रुबी हॉल क्लिनिकला आरोग्य खात्याची नोटीस
पुणे, ता. ७ : मूत्रपिंड (किडनी) प्रत्यारोपण प्रकरणी राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. रुग्णालयाचा अवयव प्रत्यारोपणाचा परवाना का निलंबित करू नये, असा जाब रुग्णालयाला विचारला आहे.
मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १५ लाख रुपयांचे आमिष दाखविले. मूत्रपिंड प्रत्यारोपण झाल्यानंतर पैसे न दिल्याचा आरोप एका महिलेने केला. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. ही मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया रूबी हॉल क्लिनिकमध्ये झाली. पण, या प्रकरणात रूबी हॉल क्लिनिकनेदेखिल याची सखोल चौकशी करण्याची मागणी करणारा अर्ज पोलिसांना दिला आहे. त्या पार्श्वभूमिवर आरोग्य खात्याने ही नोटीस रुग्णालयाला दिली.
याबाबत सार्वजनिक आरोग्य खात्याच्या संचालिका डॉ. साधना तायडे म्हणाल्या, ‘‘आरोग्य खात्याच्या पुणे परिमंडळाच्या उपसंचालक कार्यालयाकडून या प्रकरणाची माहिती मिळाली. रुग्णालयाच्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचे त्यात नमूद केले होते. अवयवदान करणाऱ्या दात्याची तक्रार आहे. त्या तक्रारीच्या आधारावर रुग्णालयाला नोटीस पाठविली आहे. त्यात रुग्णालयाचा परवाना का निलंबित करू नये, अशी विचारणा केली आहे. या नोटीसला उत्तर देण्यासाठी रुग्णालयाला २४ तासांची मुदत दिली आहे. या मुदतीत रुग्णालयाने आपली बाजू संचालक कार्यालयाला कळविणे आवश्यक आहे.”
रूबी हॉल क्लिनिकतर्फे ॲड. मंजूषा कुलकर्णी म्हणाल्या, “ज्या महिलेच्या नावाने ही नोटीस रुग्णालयाला मिळाली आहे, त्यांच्यावर रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण झालेलेच नाही. त्यामुळे या नोटीसला आम्ही उत्तर देणार आहोत.”
रुग्णालयाने अवयव प्रत्यारोपणासाठी कायद्यात अभिप्रेत असलेली सर्व प्रक्रियेची काटेकोरपणे अंमलबजावणी केली आहे. ससून रुग्णालयाची मान्यता, पोलिस पडताळणीचा अहवाल आहे. तसेच, ज्यावेळी ही घटना कळाली त्यानंतर लगेचच रुग्णालयानेही पोलिस तक्रार दाखल केली आहे, असे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.