पंजाब-बंगळूरमध्ये अंतिम लढत

पंजाब-बंगळूरमध्ये अंतिम लढत
Published on

अहमदाबाद, ता. १ : कर्णधार श्रेयस अय्यरने झळकावलेल्या नाबाद ८७ धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाब किंग्स संघाने रविवारी मध्यरात्री पार पडलेल्या आयपीएल क्वालिफायर-२ मधील लढतीत मुंबई इंडियन्सवर पाच विकेट राखून विजय मिळवला आणि रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. पंजाबने २०१४ नंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला हे विशेष. आता येत्या तीन जूनला होणार असलेल्या जेतेपदाच्या लढतीत त्यांच्यासमोर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचे आव्हान असणार आहे. मुंबईचे आव्हान येथेच संपुष्टात आले.
मुंबईकडून पंजाब संघासमोर २०४ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. ट्रेंट बोल्टने प्रभसिमरन सिंगला सहा धावांवरच बाद करीत पहिला धक्का दिला. त्यानंतर प्रियांश आर्या व जॉश इंग्लिस यांनी अनुक्रमे २० व ३८ धावा करीत झुंज देण्याचा प्रयत्न केला. अश्‍वनीकुमारने प्रियांशला, तर हार्दिक पंड्याने इंग्लिसला बाद करीत पंजाबचा पाय खोलात नेला. कर्णधार श्रेयस अय्यर व नेहल वधेरा या जोडीने पंजाबच्या विजयासाठी प्रयत्न केले. दोघांनी ८४ धावांची भागीदारी रचत पंजाबच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. अश्‍वनीकुमारच्या गोलंदाजीवर नेहल ४८ धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. यानंतर हार्दिक पंड्याच्या अचूक थ्रोवर शशांक सिंग धावचीत झाला. त्यानंतर श्रेयस अय्यर (नाबाद ८७ धावा) व मार्कस स्टॉयनिस (नाबाद २ धावा) या जोडीने पंजाबच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अय्यरने आपली खेळी पाच चौकार व आठ षटकारांनी सजवली.
याआधी पंजाब संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा व जॉनी बेअरस्टो या सलामीवीरांनी गुजरातविरुद्धच्या लढतीत आक्रमक फलंदाजी करीत मुंबईला छान सुरुवात करून दिली होती. पंजाबविरुद्धच्या लढतीत मात्र रोहित शर्मा अपयशी ठरला. मार्कस स्टॉयनिसच्या गोलंदाजीवर तो विजयकुमार वैशाखकरवी आठ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर जॉनी बेअरस्टो व तिलक वर्मा या जोडीने ५१ धावांची भागीदारी करीत मुंबईच्या धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला. बेअरस्टोने २४ चेंडूंमध्ये ३८ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने तीन चौकार व दोन षटकार मारले. विजयकुमार वैशाखने त्याला बाद करीत अडसर दूर केला.
तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव या जोडीने ७२ धावांची भागीदारी करताना मुंबईसाठी मोलाची कामगिरी बजावली. दोघांनी धडाकेबाज फलंदाजी करताना पंजाबच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळताना सूर्यकुमार ४४ धावांवर बाद झाला. काईल जेमिसनने तिलक वर्मालाही झटपट बाद केले. त्यानेही ४४ धावा केल्या. अझमतुल्ला उमरजई याने हार्दिक पंड्याला १५ धावांवरच बाद करीत धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. नमन धीर याने अखेरच्या षटकांमध्ये दमदार फलंदाजी करीत मुंबईसाठी आणखी एक महत्त्वाची खेळी केली. त्याने १८ चेंडूंमध्ये ३७ धावा फटकावल्या. मुंबईने २० षटकांमध्ये सहा बाद २०३ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स- २० षटकांत सहा बाद २०३ धावा (जॉनी बेअरस्टो ३८, तिलक वर्मा ४४, सूर्यकुमार यादव ४४, नमन धीर ३७, अझमतुल्ला उमरजई २/४३) पराभूत वि. पंजाब किंग्स- १९ षटकांत पाच बाद २०७ धावा (जॉश इंग्लिस ३८, श्रेयस अय्यर नाबाद ८७, नेहल वधेरा ४८, अश्‍वनीकुमार २/५५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com