पंचनामा : सु. ल. खुटवड
घायाळ करणारी नजर
अन् पार्किंगचं गाजर!

पंचनामा : सु. ल. खुटवड घायाळ करणारी नजर अन् पार्किंगचं गाजर!

लक्ष्मी रस्त्यावर दुचाकी पार्किंगसाठी अमोल घिरट्या घालत होता. घारीसारखी नजर त्याची भिरभिरत होती. तेवढ्यात शंभर फुटांवर एकजण गाडी बाहेर काढत असल्याचे त्याला दिसले. तो गाडीसह तातडीने तिथे पोचला. तेवढ्यात एक तरुणीही गाडीसह तिथे आली. ‘‘ओ काका, गाडी मी येथे लावणार आहे. तुम्ही बाजूला व्हा.’’ त्या तरुणीने आवाज चढवत म्हटले. खरं तर तिने विनंती केली असती तर अमोलने आनंदाने ती मान्य केली असती. मात्र, तिने ‘काका’ म्हटल्याचे त्याच्या चांगलंच जिव्हारी लागलं.

‘‘ओ काका कोणाला म्हणताय? तुमच्याच वयाचा मी आहे ना? आणि दुसरं म्हणजे हे गृहस्थ गाडी बाहेर काढत होते. त्यावेळी मी लगेच आलो. माझ्यानंतर तुम्ही आला आहात.’’ अमोलने रागाने म्हटले. ‘‘ओ, गृहस्थ कोणाला म्हणताय. अजून माझे लग्नही झालं नाही. तुम्हाला काका म्हटलेलं आवडत नाही आणि खुशाल मला गृहस्थ म्हणताय.’’ राजेशने म्हटले. ‘‘तुमचं लग्न झालं नाही, हा काय माझा दोष आहे का? गाडी लवकर बाहेर काढा.’’ अमोलने म्हटले. ‘‘हे पहा काका, तुम्ही या जागेवर आधी पोचला असलात तरी मी तेथूनच नजरेने ही जागा बुक केली आहे. त्यामुळे या जागेवर माझाच हक्क आहे.’’ त्या तरुणीने अमोलला सुनावले. ‘‘नजरेने जागा बुक केलीय म्हणजे? हा काय प्रकार असतो. एसटीत रुमाल टाकून सीट बुक केल्याचं माहिती होतं. ज्या वयात तरुणांना नजरेने घायाळ करायचं, त्या वयात नजरेने जागा काय बुक करताय?’’ अमोलने हसत म्हटले.

‘‘तुम्ही आगाऊपणा करुन, गूळ पाडू नका. तुमच्या बोलण्याला मी फसायचे नाही. तुमच्यासारखी शेकडो पोरं माझ्या पुढं पुढं करत असतात.’’ त्या तरुणीने म्हटले. त्यावर अमोल चिडून म्हणाला, ‘‘स्वत:च्या सौंदर्याचा विनाकारण अभिमान बाळगू नका. मी त्या शेकडो मुलांमध्ये येत नाही, एवढं लक्षात घ्या.’’ गाडी पार्किंगवरून दोघांमधील वाद वाढतच चालला होता. त्यामुळे बघ्यांचीही गर्दी वाढत चालली होती. त्यामुळे दोघांनाही चेव आला होता.

‘‘काका, तुम्ही बाजूला व्हा. मला गाडी लावायची आहे.’’ त्या तरुणीने पुन्हा म्हटले. ‘‘अहो, मी बाजूला होऊन काय करू? आधी या गृहस्थाने गाडी बाहेर काढली पाहिजेल ना. अहो किती वेळ लावताय, गाडी काढायला?’’ अमोलने चिडून म्हटले. ‘‘पण मी का गाडी बाहेर काढू? मला नाही जमणार.’’ राजेशने म्हटले. ‘‘अहो असं काय करताय? पार्किंगमधून तुम्ही गाडी बाहेर काढत होता म्हणून तर आम्ही दोघे धावत आलो ना. ही शुद्ध फसवणूक आहे. मी तुमचा निषेध करतो.’’ अमोलने रागाने म्हटले.

‘‘अहो दर अर्ध्या तासाने मी गाडी बाहेर काढल्यासारखं करतो. त्यावेळी दोघे-तिघे धावत येतात व भांडत बसतात. असलं भांडण बघायला मला फार आवडतं. हल्ली कशातूनच निर्भेळ मनोरंजन होत नाही. तसेच वेळही जात नाही. त्यामुळे मी हा मार्ग निवडलाय. या करमणुकीसाठी एक रुपया खर्च नाही. शिवाय गाडी आपलीच हवीय, असाही काही नियम नाही.’’ राजेशच्या या खुलाशावर तरुणीसह अमोलने त्याच्याकडे खाऊ की गिळू या नजरेने पाहिले. अर्ध्या तासाने राजेश इकडे-तिकडे पाहत पार्किंगमधील गाडी पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com