संपकाळात सेवा सुरळीत ठेवा
आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांच्या पत्राद्वारे सूचना

संपकाळात सेवा सुरळीत ठेवा आरोग्य आयुक्त धीरजकुमार यांच्या पत्राद्वारे सूचना

पुणे, ता. १७ : राज्यातील विविध सरकारी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रुग्णसेवेत कुठेही बाधा येऊ नये, विनाअडथळा सार्वजनिक आरोग्य सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध राहाव्यात यासाठी पर्यायी तसेच कंत्राटी मनुष्यबळाचा वापर करून नियोजन करावे, अशा सूचना राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार आरोग्य सेवा आयुक्त धीरजकुमार यांनी राज्यातील उपसंचालक, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना पत्राद्वारे सूचना दिल्या आहेत.

संपकाळात राज्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अत्यावश्यक असणारी आरोग्य सेवा सुरू राहावी यासाठी क्षेत्रीय यंत्रणांशी योग्य तो समन्वय साधावा. विशेषतः अत्यावश्यक सेवा, अतिदक्षता विभाग, प्रसूती या संवेदनशील विभागांची सेवा अविरत सुरू राहील, याबाबत दक्षता घ्यावी. पर्यायी मनुष्यबळाबाबत आवश्यक उपाययोजना आखून कुठल्याही परिस्थितीत सार्वजनिक आरोग्य संस्थांमधील रुग्णसेवा बाधित होणार नाही, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या आहेत.

रुग्णसेवेत बाधा येऊ नये यासाठी अपघात विभाग, आपत्कालीन कक्ष, रुग्णवाहिका सुसज्ज ठेवाव्या. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवा अखंडित सुरू राहील. क्षेत्रीय स्तरावर राष्ट्रीय आरोग्य अभियान व इतर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध कंत्राटी मनुष्यबळ अत्यावश्यक वैद्यकीय सेवांसाठी नियुक्त करावे, असेही पत्रात म्हटले आहे. आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्त्वावर जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर आवश्यकतेनुसार दैनंदिन तत्त्वावर मनुष्यबळ नियुक्त करण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

दैनंदिन तत्त्वावर मनुष्यबळ भरती करताना कंत्राटी सेवा लेखाशीर्षांतर्गत अनुदान उपलब्ध नसल्यास रुग्ण कल्याण समिती किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात यावे, असेही पत्रात म्हटले आहे. रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक रुग्णालयात समन्वयकाची नेमणूक करण्यात करण्यात येणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत कार्यरत आरोग्य मित्र यांच्या नेमणुकादेखील करता येणार आहेत.

संपामध्ये सहभागी कर्मचारी, आरोग्य संस्थामध्ये उपस्थित कर्मचारी, बाधित रुग्ण यांच्याबाबतची दैनंदिन माहिती उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या असून, त्यासाठी राज्यस्तर, उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळे तसेच जिल्हा शल्य चिकित्सक स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com