चालून आलं स्थळ अंगातलं गेलं बळ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चालून आलं स्थळ
अंगातलं गेलं बळ!
चालून आलं स्थळ अंगातलं गेलं बळ!

चालून आलं स्थळ अंगातलं गेलं बळ!

sakal_logo
By

स्वारगेट एसटी आगारात समोरच्या बाकड्यावर बसलेली सुंदर तरुणी आपल्याकडे अधून-मधून पाहून स्मितहास्य करत असल्याचे पाहून विराजच्या छातीची धडधड वाढली. आपण स्वप्नात तर नाही ना, अशी शंका त्याला आली. त्यामुळे त्याने स्वतःला चिमटा काढून पाहिला. खरं तर अशी घटना त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच घडत होती. आतापर्यंत त्याला कोणत्याही मुलीने भाव दिला नव्हता. कॉलेजमध्ये असताना मुली आपल्याकडे बघून स्मितहास्य करीत नाहीत. मग आपणच त्यांच्याकडे पाहून हसलं तर बिघडतंय का? असा विचार त्याने केला आणि एक-दोघीकडे पाहून तो हसला.
‘‘माकडासारखं दात काढायला काय झालं रं तुला? का वेड-बिड लागलंय?’’ अशी ‘प्रेमळ’ विचारपूस त्यांनी केली होती. त्यानंतर तो कोणाकडे पाहून हसला नाही, की त्याच्याकडे पाहून कोणी हसलं नाही. समोरच्या मुलीच्या नादात कोल्हापूरला जाणाऱ्या दोन एसटी त्याने सोडून दिल्या. बस काय दर अर्ध्या तासाला लागतेय. अशी सुंदर मुलगी परत आपल्याला भेटेल का? असा विचार त्याने केला. दोघांच्या नजरा एकमेकांना भिडू लागल्या. आता विराजची भीडही चेपली होती. तो आपल्या जागेवरुन उठून तिच्याशेजारी गेला.
‘‘कोल्हापूरला चालला काय?’’ विराजने विचारले. ‘‘हो.’’ तिने उत्तर दिले. ‘‘पुण्यात शिक्षणासाठी की नोकरीसाठी?’’ त्याने पुढचा प्रश्न विचारला. ‘‘हिंजवडीतील आयटी कंपनीत नोकरीला आहे.’’ तिने उत्तर दिले. मग विराजनेही कोल्हापूरची जमीन-जुमला, नोकरी, पुण्यातील स्वतःचा फ्लॅट याविषयी माहिती दिली. ‘असलं स्थळ हातचं घालवून उपयोगाचं नाही’ हे त्याला पटलं होतं. आता कोल्हापूरच्या घरी हिला असंच घेऊन जावं आणि आई-वडिलांना त्यांची सून दाखवावी. नंतर आठ-दहा दिवसांत लग्नाचा बार उडवून टाकावा, असा विचार त्याने केला. गप्पांच्या ओघात तिचं नाव भाग्यश्री असल्याचं त्याला कळलं. ‘‘चहा घ्यायचा का?’’ त्याने सहज विचारलं. तिनेही होकार दिला. मग शेजारच्या हॉटेलमध्ये दोघांनी चहा घेतला. थोड्यावेळाने ती दोघे परत आपल्या जाग्यावर आली. ‘‘माझी आई म्हणते की लग्नासाठी आतापासूनच दागिने करून ठेव. त्यामुळे मी दागिनेही केलेत. आईला तेच दाखवायला चाललोय.’’ असे म्हणून विराजने दहा तोळ्यांचा राणीहार तिला दाखवला. गळ्यातील पाच तोळ्यांची चेनही दाखवली. ‘‘तुम्ही फारच नियोजन करता. तुमची बायको नशीबवान असेल.’’ तिने कौतुक केल्यावर विराजच्या अंगावर मूठभर मांस चढले.
‘‘तुझे आई-वडिल काय करतात?’’ विराजने विचारलं. त्यावेळी तिच्या डोळ्यात पाणी आलं. ‘‘आईचा गेल्या महिन्यांत अपघात झालाय. वडिलांना अर्धांगवायू आहे. दोघेही अंथरुणाला खिळून असतात.’’ असं म्हणून भाग्यश्री रडू लागली. ‘‘अनेक वेळा वाटतं नोकरी सोडून, त्यांची सेवा करावी पण धीर होत नाही.’’ असं म्हणून ती विराजच्या गळ्यात पडून रडू लागली. ‘‘आपण लग्नानंतर तुझ्या आई-वडिलांना पुण्यात आणून, चांगले उपचार करू.’’ विराजने तिला धीर दिला.
‘‘तुम्ही किती चांगले आहात. तुमच्यासारख्या माणसं दुर्मिळ आहेत.’’ तिने डोळे पुसत म्हटले. ‘‘बाथरुमला जाऊन येते’’ असे म्हणून ती गेली. त्यानंतर सुखी संसाराचे चित्र विराज रंगवू लागला. स्वप्नं पहायला त्याला जास्तवेळ मिळू लागला. कारण पंधरा मिनिटे झाली तरी भाग्यश्री परत आली नव्हती. त्यानंतर तो वाट पाहू लागला. अर्धा तास झाला, तास झाला. आता मात्र विराज बेचैन झाला. सहज त्याने बॅग खोलली तर दहा तोळ्यांचा राणीहार गायब होता. पाच तोळ्यांची सोन्याची चेनही गळ्यात नव्हती. खिसा चाचपून पाहिला तर पाकीटही नव्हतं. आता मात्र रडायची पाळी त्याची होती.
‘‘हम दिल दे चुके सनम’’ या चित्रपटातील ‘‘लूट गये...हा...लूट गये, हम तेरी मुहब्बत में’’, हे गाणं त्याच्या ओठांवर आलं.