होर्डिंग विम्याचे सुरक्षाकवच कागदावरच

होर्डिंग विम्याचे सुरक्षाकवच कागदावरच

पुणे, ता. २० : शहरात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट सुरूच आहे. दुसरीकडे ‘अर्थपूर्ण परवानग्या’ देऊन नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग उभारले जात आहेत. मात्र यात पुणेकरांच्या सुरक्षेचा विचार झालेला दिसत नाही. दुर्घटना घडल्यास त्यात नागरिकांच्या मदतीसाठी प्रत्येक होर्डिंग व्यावसायिकाने विमा काढणे आवश्यक आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे.
किवळे येथे अनधिकृत होर्डिंग पडून पाच नागरिकांचा जीव गेला. त्यामुळे होर्डिंगच्या सुरक्षतेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पुणे शहरात व उपनगरांत मोठ्या प्रमाणात होर्डिंग व्यावसायिकांचा सुळसुळाट झालेला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार २ हजार ४८५ अधिकृत होर्डिंग आहेत, तर सद्यःस्थितीत २ हजार ६२९ पैकी चौदाशे अनधिकृत होर्डिंग शिल्लक आहेत. या अनधिकृत होर्डिंगवर महापालिकेचे कोणतेही नियंत्रण नाहीच; पण ते सुरक्षित आहेत का याबाबत माहिती उपलब्ध नाही.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून पुढील पंधरा दिवसांत त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश होर्डिंग व्यवसायिकांना दिलेले आहेत. तसेच त्याचा पाठपुरावा करण्यासही आकाशचिन्ह विभागासह क्षेत्रीय कार्यालयांना सांगितले आहे. जे व्यावसायिक स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याचा अहवाल सादर करणार नाहीत ते होर्डिंग अनधिकृत समजून त्यांच्यावर पुढील कारवाई प्रस्तावित करावी, असेही त्या आदेशात नमूद केले आहे.

नियमावलीत अस्पष्टता
महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने २०२२ मध्ये आकाश चिन्ह विभागासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. त्यानुसार होर्डिंगला परवानगी दिली जाते. या नियमावलीमध्ये होर्डिंग पडून दुर्घटना घडल्यास त्यामधील नागरिकांच्या मदतीसाठी विमा काढणे आवश्यक आहे. पण या नियमाची अंमलबजावणी पुणे महापालिकेकडून केली जात नसल्याचे समोर आले आहे. बहुतांश होर्डिंग हे रस्त्याच्या कडेने असलेल्या इमारतींवर आहेत. चौकांमध्ये अतिशय जवळ लावलेले आहेत. त्यामुळे धोकादायक स्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत विमा काढण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आलेले आहे. दरम्यान, आकाश चिन्ह विभागाने दोन दिवसांपूर्वीच काढलेल्या आदेशात सर्व होर्डिंग व्यावसायिकांनी दुर्घटनाग्रस्तांना मदत करण्यासाठी विमा काढून घेण्याचे आदेश दिलेले आहेत. मात्र कोणत्या कोणत्या गोष्टींचा मदतीमध्ये समावेश झाला पाहिजे, याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख नाही.

शासनाच्या नव्या नियमानुसार होर्डिंग व्यावसायिकांनी दुर्घटना घडल्यास त्यातील नागरिकांना मदत करण्यासाठी विमा काढणे आवश्यक आहे. पण अद्याप असे विमा काढण्यात आलेले नाहीत. तसेच हा विमा किती लाखांचा असला पाहिजे याबाबत स्पष्टता नसल्याने यासंदर्भात राज्य सरकारशी पत्रव्यवहार करून विचारणा केली जाणार आहे.
- माधव जगताप, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग, पुणे महापालिका


गेल्या दोन दिवसांतील कारवाई
- अनधिकृत होर्डिंग - ३४
- फ्लेक्स - २७४
- झेंडे - १८
- पोस्टर - ४६
- किऑस - ३२

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com