पुण्यातील तापमान चाळिशीवर

पुण्यातील तापमान चाळिशीवर

पुणे, ता. १८ ः पुणे शहरातील कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्यास सुरवात झाली आहे. गुरुवारी (ता. १८) कमाल तापमानाचा पारा चाळीशीच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी पारा ४० अंशांच्या वर गेला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा आता पुन्हा तीव्र होऊ लागल्या असून अंशतः ढगाळ वातावरणामुळे उकाडादेखील वाढला आहे. पुढील तीन दिवस शहर आणि परिसरात तापमानातील वाढ अशीच राहणार असून, त्यानंतर मात्र अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
गुरुवारी पुणे शहरात ३९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली, तर जिल्ह्यात सर्वाधिक तापमान कोरोगाव पार्क येथे ४२.१ अंश सेल्सिअस इतके होते. येत्या रविवारपर्यंत (ता. २१) शहर आणि परिसरात उन्हाची स्थिती अशीच कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यातही सध्या कमाल तापमानातील चढ-उतार कायम आहे. गुरुवीर राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद जळगाव येथे ४२.७ अंश सेल्सिअसइतकी झाली. विदर्भ आणि मराठवाड्यात कमाल तापमान हे ४० अंशाच्या दरम्यान स्थिर आहे. विदर्भात मात्र सोमवारपासून (ता. २२) तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे.
पूर्व उत्तर प्रदेश व लगतच्या परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, या प्रणालीपासून मध्य प्रदेश, विदर्भ तसेच तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यात विदर्भात पावसासाठी अनुकूल वातावरण होत असून, तुरळक ठिकाणी पुढील तीन दिवसांनंतर पावसाचा अंदाज आहे.

मॉन्सून शनिवारपर्यंत अंदमानात होणार दाखल
हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) येत्या शनिवारपर्यंत (ता. २०) अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोषक हवामानाची स्थिती होत असून, हे वारे दक्षिण बंगालचा उपसागर, दक्षिण अंदमान समुद्र आणि निकोबार बेटांवर दाखल होण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com