गो ग्रीन योजनेत पुण्याची राज्यात आघाडी

गो ग्रीन योजनेत पुण्याची राज्यात आघाडी

पुणे, ता. ५ : महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत पुणे परिमंडलातील वीजग्राहकांनी राज्यात आघाडी घेतली आहे. पुणे परिमंडलातील ४९ हजार ४९२ ग्राहक या योजनेत सहभागी झाले असून, त्यामध्येही हडपसर उपविभागाने बाजी मारली आहे.

वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करीत केवळ ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्या पुणे परिमंडलातील ग्राहकांची संख्या ९२ हजार ८१३ पर्यंत पोचली आहे. या ग्राहकांकडून गो ग्रीन योजनेच्या माध्यमातून एक कोटी ११ लाख ३७ हजार ५६० रुपयांची वार्षिक बचत केली असल्याचेही समोर आले आहे. तर गेल्या २० दिवसांमध्ये पुणे परिमंडलामधील २ हजार ६८१ ग्राहकांनी या योजनेत नव्याने सहभाग नोंदविला आहे.

ई-मेल, एसएमएसचा पर्याय निवडल्यास सवलत
या योजनेत छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिलात १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. वीजबिल तयार झाल्यानंतर लगेचच संगणकीय प्रणालीद्वारे ते ‘गो-ग्रीन’मधील ग्राहकांना ‘ई-मेल’द्वारे पाठविण्यात येत आहे. सोबतच ‘एसएमएस’द्वारेदेखील वीजबिलाची माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना प्रॉम्ट पेमेंटचा लाभ घेणे अधिक शक्य होत आहे.

शहरात हडपसर प्रथम, वडगाव धायरी द्वितीय
पुणे परिमंडलांतर्गत पुणे शहरात ४९ हजार ४९२ ग्राहक गो-ग्रीन योजनेत सहभागी झाले आहेत. यामध्ये हडपसर उपविभागातील ५५४४, वडगाव धायरीमधील ४८७५, धनकवडीतील ४५७१ तर विश्रांतवाडी उपविभागातील ३६५८ ग्राहकांची संख्या लक्षणीय आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये सांगवी प्रथम
पिंपरी चिंचवड शहरात गो-ग्रीनमध्ये २७ हजार १९९ ग्राहक सहभागी आहेत. यामध्ये सांगवी उपविभागातील सर्वाधिक ८३१९ तर आकुर्डी ५१६४ व चिंचवड उपविभागामधील ५३४२ ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी आहेत.

जिल्ह्यात सात तालुके आघाडीवर
पुणे ग्रामीण मंडलांतर्गत आंबेगाव, जुन्नर, खेड, मावळ, मुळशी, वेल्हे व हवेली तालुक्यामध्ये १६ हजार १२२ ग्राहकांनी गो-ग्रीनमध्ये सहभाग घेतला आहे. यामध्ये हडपसर ग्रामीण उपविभागातील ४३५३ ग्राहकांची सर्वाधिक संख्या आहे.

असे होता येईल सहभागी
महावितरणच्या गो-ग्रीन योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीजबिलावर छापलेल्या जीजीएन (GGN) या १५ अंकी क्रमांकाची नोंदणी महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपद्वारे किंवा महावितरणच्या संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंकवर जाऊन करावी. या बाबतची अधिक माहिती www.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

गो-ग्रीन योजनेत सहभागी झालेल्या वीजग्राहकांना छापील वीजबिलांची गरज भासल्यास त्यांना ईमेलद्वारे प्राप्त झालेले दरमहा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच संकेतस्थळावर चालू वीजबिलासह मागील ११ महिन्यांची वीजबिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीजग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.

गो-ग्रीन योजना ही काळाची गरज आहे. वीजग्राहकांनी या योजनेत सहभागी व्हावे व पर्यावरण रक्षणात योगदान द्यावे.
- राजेंद्र पवार, मुख्य अभियंता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com