कसबा पोटनिवडणूक : अजूनही उमेदवारी जाहीर नाही; पटोले पुण्यात ठाण मांडून 
महाविकास आघाडीत अजूनही गोंधळच

कसबा पोटनिवडणूक : अजूनही उमेदवारी जाहीर नाही; पटोले पुण्यात ठाण मांडून महाविकास आघाडीत अजूनही गोंधळच

पुणे, ता. ५ : कसबा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसमधील गोंधळ रविवारी रात्री उशिरापर्यंत मिटला नव्हता. मात्र पक्षाकडून माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर यांचे नाव निश्चित झाल्याची जोरदार चर्चा होती. रात्री उशिरा त्यांचे नाव जाहीर होईल, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.

कसबा पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघ्या दोन दिवसांचा कालावधी राहिला आहे. उमेदवारी जाहीर करण्यात भाजपने आघाडी घेतली आहे. मात्र काँग्रेसमधील उमेदवारीवरून सुरू असलेला घोळ अद्याप मिटलेला नाही. गेल्या दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पुणे शहरात ठाण मांडून आहेत. त्यामुळे रविवारी पक्ष कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकणार हे स्पष्ट होईल, अशी अपेक्षा महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती. परंतु रात्री उशिरापर्यंत पक्षाकडून नाव जाहीर करण्यात आले नव्हते.

पक्षाकडून रवींद्र धंगेकर, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे यांच्यासह १७ जण इच्छुक आहेत. त्यामध्ये धंगेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांचे नाव आज पक्षाकडून जाहीर होईल, असे अपेक्षित होते. आज दिवसभर पटोले पुण्यात होते. या निवडणुकीसाठी आणि अदानीविरोधात उद्या (सोमवारी) पक्षाच्या वतीने करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण शहरातील आणि त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या ब्लॉक अध्यक्षांची बैठक घेतली. त्यानंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीबाबत चर्चा झाली. रात्री उशिरापर्यंत या बैठका सुरू होत्या. या दरम्यान पटोले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परंतु कसब्यातून कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे, त्यांचे नाव मात्र त्यांनी जाहीर केले नाही. पक्षाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले बाळासाहेब दाभेकर मात्र एकाही बैठकीला हजर राहिले नाही. पटोले यांनी दाभेकर यांच्याशीदेखील फोनवरून संपर्क साधून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दाभेकर यांनी त्यास नकार देत उमेदवारी कायम ठेवणार असल्याचे सांगितले. त्यामुळे पक्षात बंडखोरी होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत.

रात्री उशिरापर्यंत उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले नसले, तरी उद्या सकाळी पक्षाचा उमेदवार अर्ज भरणार आहे. असे मेसेज पक्षाच्या वतीने सायंकाळी कार्यकर्त्यांना पाठविण्यात आले. त्यामुळे उमेदवार निश्चित झाला नसताना, अर्ज भरण्याचे मेसेज कसे आले, असा प्रश्‍न कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात होता. दरम्यान, कसबा आणि चिंचवड या दोन्ही ठिकाणच्या पोटनिवडणुका महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितरीत्या लढणार आहेत. तसेच, कसबा विधानसभा काँग्रेस तर चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढणार असल्याची माहिती पटोले यांनी रात्री ट्विटद्वारे दिली. ही एकमेव घडामोड दिवसभरात घडल्याचे दिसून आले.

रशीद शेख यांची घरवापसी
दिवभराच्या कार्यक्रमादरम्यान काँग्रेसचे माजी नगरसेवक रफिक शेख यांच्या घरी पटोले यांनी भेट दिली. भेटीच्या वेळी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये दाखल झालेले स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रशीद शेख यांच्याशी पटोले यांनी चर्चा करून त्यांची समजूत काढली. त्यानंतर शेख यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी त्यांना प्रदेशात पद देण्याचे आश्‍वासन पक्षाच्या वतीने देण्यात आले. शेख यांच्या निमित्ताने पक्षाने पुन्हा एकदा जुने नेते आणि कार्यकर्त्यांची घरवापसी सुरू केल्याची चर्चा पक्षात सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com