नैसर्गिक पालकत्त्वाची हक्क फेटाळला

नैसर्गिक पालकत्त्वाची हक्क फेटाळला

पुणे, ता. १७ : जन्मदात्या आईचा नैसर्गिक पालकत्त्वाचा हक्क फेटाळत न्यायालयाने पाचवर्षीय नातीचा ताबा आणि पालकत्व आजी-आजोबांकडेच ठेवले आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी हा आदेश दिला. पाच वर्षांच्या नातीची इच्छा लक्षात घेऊन न्यायालयाने हा निर्णय दिला.
आई मुलीला आठवड्यातून एखादा भेटू व बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकते, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राधिका आणि अजिंक्य याचे २०१६ साली लग्न झाले होते. २०१८ मध्ये त्यांनी मुलगी झाली (पूजा - सर्व नावे बदललेली). त्यानंतर एप्रिल २०२२ मध्ये अजिंक्य यांचे निधन झाले. त्यामुळे राधिका यांनी महेश यांच्याशी विवाह करीत पुन्हा वैवाहिक जीवनाची सुरवात केली. दुसरे लग्न करीत असताना राधिका आणि तिच्या पहिल्या सासू-सासऱ्यांत समजुतीचा करारनामा झाला होता. ज्यामध्ये राधिका यांनी स्वखुशीने पूजाचा ताबा, देखरेख आणि पालकत्त्व तिच्या सासू-सासऱ्यांकडे दिले होते, असे आजी-आजोबांनी दाखल केलेल्या दाव्यात नमूद आहे.
करारनामा झाल्यावर काही महिन्यानंतर राधिका यांनी सासू-सासऱ्यांच्या विरोधात मुलीचा अनधिकृतपणे ताबा घेतल्याची तक्रार येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल केली. त्यावर न्यायालयाने राधिका ही मुलीची जन्मदाती आई व नैसर्गिक पालक असल्याने पूजाचा ताबा तिच्या आईला देण्याचा आदेश सासू-सासऱ्यांना दिला. या निकालाच्या विरोधात आजी-आजोबांनी ॲड. गंधार सोनीस यांच्यामार्फत सत्र न्यायालयात धाव घेतली. मुलीचे पालकत्व, देखरेख तिचे पालन-पोषण आणि तिचा शैक्षणिक खर्च हे तिचे आजी-आजोबा करीत आहे. ते नैसर्गिक पालक नसले तरी मुलाचा त्यांच्याकडे असलेला ताबा हा अनधिकृत आहे, असे म्हणता येणार नाही. मुलीच्या आईने ताबा मिळण्यासाठी केलेला दावा हे एक षडयंत्र आहे, असा युक्तिवाद ॲड. सोनीस यांनी केला.

समजून घेतली मुलीची इच्छा
सत्र न्यायालयात दाखल झालेल्या या दाव्यात न्यायालयाने मुलीशी देखील संवाद साधला. तिची काय इच्छा आहे. तिचे भवितव्य, हित आणि तिची मानसिकता लक्षात घेऊन सत्र न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्याचा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल फेटाळून लावला व मुलीला तिच्या आजी-आजोबांकडे सोपवले.

नैसर्गिक पालकत्वापेक्षाही वृद्ध आजी-आजोबांचे पालकत्वाची हक्क सुद्धा अशा अपवादात्मक प्रकरणात महत्त्वाचे आहे. तेच सत्र न्यायालयाने दिलेल्या न्यायनिवाड्यातून पुन्हा एकदा अधोरेखांकित झाले आहे. या निकालामुळे वृद्ध आजी-आजोबांना न्याय मिळाला.
- ॲड. गंधार सोनीस, आजी-आजोबांच्या वतीने बाजू मांडलेले वकील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com