सलग अभ्यासातून घ्या थोडी विश्रांती ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सलग अभ्यासातून घ्या थोडी विश्रांती !
सलग अभ्यासातून घ्या थोडी विश्रांती !

सलग अभ्यासातून घ्या थोडी विश्रांती !

sakal_logo
By

पुणे, ता. १९ : परीक्षेच्या काळात दिवसातील सलग १६-१७ तास अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी थोडीशी विश्रांती घेणं, हलका व्यायाम करणं, त्यातही सूर्यनमस्कार, प्राणायाम, चालणे असे अगदी जमतील ते व्यायाम, जमतील त्या वेळेत करणे गरजेचे असल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा म्हटलं की, अभ्यासाचे काटेकोर वेळापत्रक काही महिने अगोदरपासूनच तयार असते. दिवसातील १६ ते १७ तास अभ्यास करण्याचे वेळापत्रक मुलांनी अगदी कसोशीने बनविलेले असते. अशात अगदी जेवण, पाणी पिणे यासाठी किती वेळ द्यायचा, हे देखील ठरविलेले असते. पण, परीक्षेची तयारी करताना थोडासा वेळही विश्रांती, व्यायाम, फिटनेससाठी काढला जात नाही, हे वास्तव आहे. या काळात अधिक एकाग्रतेने अभ्यास करायचा असल्यास व्यायामाकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. दिवसांतील अगदी २० ते ३० मिनिटे देखील व्यायाम व खेळासाठी मुलांनी द्यावी, याकडे पालकांनी लक्ष द्यावे, असे क्रीडा शिक्षक सुचवीत आहेत.

असा सांभाळा ‘फिटनेस’
१. सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि योगासने करावीत
२. एका जागेवर बसून अभ्यास न करता, थोडी विश्रांती घ्या
३. नीट आणि पुरेशी झोप घेणे तितकेच आवश्यक
४. परीक्षेच्या काळात दररोज २० ते ४० मिनिटे व्यायाम हवा

हा व्यायाम गरजेचा...
१. सकाळी उठल्यावर प्राणायाम करावे
२. सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार घालावेत
३. काही मिनिटे चालण्याचा व्यायाम करावा
४. ध्यानधारणा (मेडिटेशन) करणे गरजेचे

हे टाळावे....
- खूप कठोर, कठीण व्यायाम प्रकार
- एखादा अवघड व्यायाम प्रकार पहिल्यांदाच करणे
- अंगदुखी किंवा संपूर्ण शरीर दमायला होईल, असे व्यायाम
- कोणताही नवीन व्यायाम शिकण्याचा प्रयत्न

खेळासाठी द्या थोडासा वेळ
परीक्षेच्या काळात आवडत्या खेळासाठी थोडासा वेळ राखून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. खेळण्यातून मन ताजेतवाने होते. अभ्यास अधिक एकाग्रतेने करण्यास मदत होते. त्याशिवाय इतर मुलांबरोबरच खेळल्याने परीक्षेचा ताणही हलका होता आणि पुन्हा अभ्यास करण्यासाठी नवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे परीक्षेच्या काळातही आवडत्या खेळासाठी थोडासा वेळ राखून ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

परीक्षेच्या काळातही विद्यार्थ्यांनी सकाळच्या कोवळ्या उन्हात सूर्यनमस्कार, योगासने करावीत. या काळात ध्यान करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. दररोज किमान २० मिनिटे व्यायामासाठी राखून ठेवावीत. परीक्षेच्या काळात थोडा वेळ खेळण्यासाठी देखील द्यावा.
- अक्षय सालेकर,
शारीरिक शिक्षण शिक्षक, लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालय

सकाळी उठल्यावर सूर्यनमस्कार घालणे, प्राणायाम करणे, असा सल्ला आम्ही अर्णवला (इयत्ता दहावीत) कायम देतो. तसेच, अभ्यासातून विश्रांती घेऊन व्यायाम करावा, खेळावे, असे आवर्जून सांगतो. सतत काही तास अभ्यास केल्यानंतर मुलांनी विश्रांती म्हणून मोबाईलमध्ये डोकाविण्यापेक्षा व्यायाम करावे किंवा मोकळे खेळावे, यासाठी आम्ही आग्रही असतो.
- प्रमोद भोसले, पालक