
पुणे-मुंबई मिसिंग लिंकचे काम प्रगतीपथावर
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २ : पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील पर्यायी रस्त्याचे काम गतीने सुरू असून दोन्ही बोगद्यांचे काम जवळपास शंभर टक्के पूर्ण झाले आहे. तर आशिया खंडातील उभारण्यात येणारा सर्वात मोठ्या पूलाचे काम जवळपास पन्नास उंची मीटरपर्यंत पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गावरील प्रवाशांच्या वेळेची बचत होणार असून वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे दोन्ही कॉरिडॉर सुधारणा तथा देखभाल, दुरुस्तीसाठी बीओटी (बांधा, वापरा व हस्तांतरीत करा) या तत्वावर ३० वर्षाच्या सवलतीच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसीकडे) हस्तांतरीत करण्यात आले आहेत. याशिवाय मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील १३.३ किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंकचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे बोर घाटातील ६ किमी वळणाच्या मार्गाला हा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल.
दृष्टिक्षेपात
- केबल ब्रिज - लांबी ६४५ मीटर, उंची १३५ मीटर
- आशिया खंडातील सर्वात मोठा दरीवरील पूल असल्याचा एमएसआरडीसीचा दावा
- दोन्ही काम बोगद्याचे शंभर टक्के काम पूर्ण
मिसिंग लिंकमध्ये ही कामे होणार
- १३५ मीटर उंचीचा केबल ब्रिज
- खालापूर टोल ते खोपोली एक्झिटपर्यंत आठ पदरी रस्ता
- एक १.६ किमी लांबीचा तर दुसरा ९ किमी लांबीचा असे दोन बोगदे
- सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
- काम पूर्ण झाल्यावर पुणे-मुंबई अंतर सहा किमीने कमी
पुणे-मुंबई रस्त्यावरील मिसिंग लिंकचे काम गतीने सुरू आहे. या प्रकल्पातंर्गत दोन्ही बोगद्यांचे काम पूर्ण झाले आहे. तर पन्नास मीटर उंचीपर्यंत केबल ब्रिज उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबर २०१४ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
- राहूल वसईकर, अधिक्षक अभियंता, एमएसआरडीसी