कालवा सल्लागार समितीची
अधिवेशन संपल्यानंतर बैठक

कालवा सल्लागार समितीची अधिवेशन संपल्यानंतर बैठक

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १ : पुणे शहराच्या पाणी पुरवठ्याबरोबरच जिल्ह्यातील शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात अधिवेशन संपल्यानंतर कालवा सल्लागार समितीची बैठकीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील तीन वर्षांतील बदलत्या हवामानाचा अंदाज विचारात घेऊन पुढील वर्षीचे पावसाळ्यापर्यंतच्या पाण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात येणार आहे.
धरणांमधील पाणीसाठ्याचे वर्षभराचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येत. जलसंपदा मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होते. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन रब्बी आणि उन्हाळी हंगामातील पाणीवाटपाबाबतचे नियोजन करण्यात येते. आत्तापर्यंत रब्बीसाठी ३.८ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सिंचनासाठी सोडण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळी प्रकल्पातील खडकवासला धरणात ४९.७३ टक्के, पानशेत ६४.८९ टक्के, वरसगाव ७९.८०, तर टेमघर धरणात अवघा १२.१५ टक्के असा मिळून १८.५८ टीएमसी पाणीसाठा आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील म्हणाले, ‘‘मागील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील ठरविलेल्या नियोजनानुसार ग्रामीण भागातील सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन सुरू कऱण्यात आले आहे. पुढील ५० दिवस पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात येणार असून जवळपास पाच अब्ज घनफूट पाणी सोडण्यात येणार आहे. उन्हाची तीव्रता, बाष्पीभवन, गळती आणि मान्सून सक्रियता याचा अंदाज घेऊन उन्हाळी आवर्तनाच्या दुसऱ्या टप्प्याचा निर्णय घेण्यात येईल.’’

यंदा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीसह जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा आहे. धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात येणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कालवा सल्लागार समितीची बैठक होणार असून त्यामध्ये धरणांमधील पाणीसाठ्याचे नियोजन यांसह विभागाशी संबंधित इतर विषयांवरही चर्चा होईल.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com