राज्यात बेकायदा दस्तनोंदणी सुरूच

राज्यात बेकायदा दस्तनोंदणी सुरूच

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २ : तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणीचे प्रकार थांबविण्यात राज्य सरकारला अपयश आले असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी कवठे-महांकाळ आणि मिरज येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बेकायदा दस्त नोंदवल्याप्रकरणी एका वरिष्ठ लिपिकाला निलंबित करण्यात आले आहे.
नोंदणी उपमहानिरिक्षक गोविंद कराड यांनी वरिष्ठ लिपिक व्ही. व्ही. कुंभार यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत. कुंभार यांनी बेकायदा दस्त नोंदविल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक श्रावण हर्डीकर यांनी अहवाल मागवला होता.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने १२ जुलै २०२१ परिपत्रक काढून बेकायदा तुकडाबंदीच्या दस्त नोंदणीवर बंदी घातली. सक्षम प्राधिकरणाची परवानगी घेऊन एक-दोन-तीन गुंठे तुकडे पाडले असतील, तर अशाच दस्तांची नोंदणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्याचे प्रमाणभूत क्षेत्र निश्चित करण्यात आले होते. या प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या जमिनींचे खरेदी-विक्री व्यवहार नाकारले जात होते. या पार्श्वभूमीवर औरंगाबाद उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. सुनावणी घेऊन न्यायालयाने हे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र, या निर्णयाविरोधात तत्कालीन राज्य सरकारच्या सुचनेनुसार पुनरावलोकन याचिका दाखल करण्यात आली आहे. जोवर या याचिकेवर न्यायालय निर्णय देत नाही, तोवर तुकड्यातील जमिनींची दस्त नोंदणी करण्यात येणार नसल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. त्यानुसार तुकड्यातील जमिनींचे दस्त नोंदणीसाठी आल्यास नाकारले जात. असे असतानाच हा प्रकार उघडकीस आला.

अहवालात काय आहे?
- मिरज आणि कवठे-महांकाळ येथे कार्यरत असताना नोंदविलेल्या ३७४ दस्तांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्त नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे.
- १६ दस्तांमध्ये कमी पडलेले सहा लाख ४३ हजार १९० आणि कमी पडलेले नोंदणी शुल्क एक लाख एक हजार ९० एवढ्या रुपयांचे नुकसान केल्याचेही निदर्शनास आले आहे.
- कडेगाव येथे कार्यरत असताना १५८ दस्त आणि वाळवा येथे ११० दस्तांमध्ये बेकायदा दस्त नोंदविल्याचे समोर आले आहे.
- एकूण ६४२ दस्तांची बेकायदा नोंदणी कुंभार यांनी केले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
- सरकारचे सात लाख ४४ हजार २८० रुपयांचे नुकसान केले आहे.
- या पार्श्वभूमीवर कुंभार यांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले आहेत.

बेकायदा दस्त नोंदणी सुरूच
मध्यंतरी राज्यात बेकायदा दस्त नोंदणीचे पेव फुटले होते. पुण्यातील दहा हजार ५४१ दस्त बेकायदा पद्धतीने नोंदले गेल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागातील तब्बल ४४ अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गेल्या वर्षी कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही राज्यात बेकायदा दस्त नोंदणी सुरूच असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com