मतमोजणी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

मतमोजणी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण

पुणे, ता. १ : कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून, बुधवारी निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल तसेच निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा किसवे-देवकाते यांच्या उपस्थितीत मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क येथील मतमोजणी केंद्रात झालेल्या या प्रशिक्षणावेळी उपजिल्हाधिकारी सिद्धार्थ भंडारे, संजय तेली, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राधिका हावळ-बारटक्के आदी उपस्थित होते. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी किसवे-देवकाते आणि भंडारे यांनी प्रशिक्षणादरम्यान मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणी करताना घ्यायची काळजी, भरायचे विविध नमुने (फॉर्म) आदीबाबत सूचना दिल्या. ईव्हीएमवरील उमेदवारनिहाय मतांची मोजणी व नोंद, फॉर्म भरणे, निवडणूक आयोगाच्या एन्कॉर ऑनलाइन प्लॅटफॉर्ममध्ये माहिती भरणे, मतमोजणीनंतर पुन्हा ईव्हीएम सीलिंग करणे, साहित्य पुरवठा याबाबत प्रशिक्षण दिले. मतमोजणी प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

मतमोजणीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत. ईव्हीएम मतमोजणीसाठी टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या ईटीपीबीएससाठी (इलेक्‍ट्रॉनिक ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टिम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे ५० अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

मतमोजणीच्या प्रत्येक फेरीनंतर उमेदवारनिहाय मतांची उद्‍घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी ध्वनिक्षेपकाद्वारे करतील. सर्व फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर रॅंडम पद्धतीने पाच व्हीव्हीपॅट मशिनमधील स्लिपची मोजणी केली जाणार आहे. कंट्रोल युनिटवरील मतांची संख्या आणि व्हीव्हीपॅट स्लिपची पडताळणी केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com